Sitaphal Market :
बाळासाहेब गणोरकर
मूर्तिजापूर : प्रत्येक फळाचा एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात, त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठीही पोषक असते. गणेशोत्सव सुरू झाला की बाजारात विविध प्रकारच्या फळांची आवक वाढते.
सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून, दोन्ही फळांची आवक वाढली आहे. त्यात रस्त्याच्याकडेला बसून विकण्यात येत असलेली सीताफळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आवक जास्त असली तरी दर अद्यापही थोडे जास्तच आहेत.मूर्तिजापूर शहरातील बाजारपेठेसह कुरुम, माना, जामठी, हातगाव, सिरसो आदी भागात रस्त्याच्या कडेला व दुभाजकांवर सीताफळ विक्रेत्यांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सीताफळांची उत्पादन व आवक वाढल्याने विक्रेतेही वाढले आहेत. ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे.
• सध्या सीताफळाचा भाव आकारानुसार प्रतिकिलो १००-१२० रुपये आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक व प्रवासी थांबून सीताफळे विकत घेत असल्याचे दिसत आहे.
• थेट शेतातील ताजी फळे मिळत असल्याने सध्या सीताफळांना मागणीही वाढली आहे.
सप्टेंबर-नोव्हेंबर असतो हंगामआबालवृद्धांचे आवडते फळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळांचा हंगाम सप्टेंबर- नोव्हेंबरपर्यंत असतो. या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. दररोज सकाळी गावातून दुचाकी आणि बसमधून सीताफळे आणून ती दिवसभर विकली जात आहेत.परतवाडा येथून आणतात सीताफळसीताफळाचे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या परिसरात सीताफळांच्या मोठ्या बागा आहेत. त्या ठिकाणचे स्थानिक शेतकरी शेतातील सीताफळे विक्रीसाठी आणत आहेत. तर बहुतांश विक्रेते बागमालकांकडून सीताफळांची खरेदी करून मूर्तिजापूर परिसरात विकत आहेत.
मूर्तिजापूर परिसरात सीताफळांची लागवड केली जात आहे. गेली अनेक वर्षे माझ्यासह गावातील बहुतांश लोक सीताफळ विक्रीच्या व्यवसायात आहेत. यंदा पीक चांगले आले असून, सध्या तोडणी सुरू आहे. येत्या काळात आवक आणखी वाढणार आहे. - अब्दुल साकीब अब्दुल तमीज, फळविक्रेता, मूर्तिजापूर
माझ्या एक एकर शेतात चार वर्षापासून सीताफळाची लागवड केली आहे. दरवर्षी चांगल्या प्रमाणात उत्पादन होत आहे. सीताफळाची विक्री शेतातून व मार्केटमध्ये केली जाते. -चंद्रकांत गणाेरकर, शेतकरी, मधापुरी