मागील वर्षभरापासून सोयाबीनला दर कमी मिळत होता. यामुळे शेतकरी गरजेपुरते सोयाबीन विकून बाकीचे घरात ठेवत होते. वर्षभरात सोयाबीनमधून शेतकऱ्यांना फारसे हाती काही लागले नाही. मात्र, आता दरात वाढ सुरू झाली आहे. क्विंटलला पाच हजारांपर्यंत भाव आहे, तर विदर्भात पाच हजारांचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे सोयाबीन भावात आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बळीराजाचा चिंतेतजिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर वाढला. तो साडेपाच हजारांवर गेला; पण त्यानंतर दरात घसरण झाली. पाच हजारांच्या खाली भाव आला. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव ४,५०० ते ४,६०० च्यादरम्यान होता. त्यामुळे दराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता काय करायचे, असा प्रश्न पडलेला होता.
पाच वर्षांत सोयाबीन क्षेत्रात वाढ सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरजवळ असते. गेल्यावर्षी सोयाबीनचे ६८ हजार हेक्टर निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्षात ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले होते. याला कारण म्हणजे सोयाबीनला चांगला भाव मिळत होता. गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढच होत चाललेली आहे.
यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्रसातारा जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून सोयाबीन क्षेत्रात वाढ होत चालली आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात तब्बल ८७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. टक्केवारीत हे प्रमाण १२७ होते. यावर्षी कृषी विभागाने ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र निश्चित केले. प्रत्यक्षात मात्र ८५ हजार हेक्टरवरच पेरणी झाली होती.
सोयाबीन उत्पादनात घट झालेली आहे. त्यामुळे दरात अचानक वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेची अभ्यासपूर्ण माहिती घेऊन् सोयाबीनची टप्प्याटप्याने विक्री करावी. यापुढेही भाववाढ होईल, असा बाजाराचा अंदाज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना