सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक घटली होती. महिनाभरापासून दररोज १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक होत होती.
मागील आठवड्यात त्यात वाढ होऊन सरासरी ३०० ते ३५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. दर मात्र सरासरी प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंत राहिला आहे.
सोलापूर बाजार समितीत यंदा कांद्याची म्हणावी तशी आवक झाली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान ८०० ट्रक कांद्याची आवक असते.
यंदा मात्र, परतीच्या पावसामुळे पाणी लागून कांद्याच्या उत्पादनच मोठी घट झाली. त्यामुळे जानेवारीत सुरुवातीला सुमारे ४०० ते ४५० ट्रक कांद्याची आवक झाली.
त्यानंतर आवक वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती; मात्र दरात घसरण झाल्याने आवक घटली. काही दिवस केवळ १०० ते १२० ट्रक कांदा विक्रीला येत होता.
तेव्हाही दर वाढला नाही; मात्र मागील महिन्यापासून सरासरी दर १८०० ते २००० रुपयांपर्यंत आहे. तर चांगल्या मालाला ३२०० ते ४००० रुपयांपर्यंत दर आहे.
परतीच्या पावसानंतर आणि उजनीतून वेळेत पाणी सुटल्याने अनेक भागात उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. त्याची आवक आता सुरू झाली आहे.
त्यामुळे मागील आठ दिवसांपासून ३०० ते ३५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. येत्या काही दिवसात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळी कांद्याला दर मिळण्याची आशाउन्हाळी कांदा जास्त काळ टिकतो. पुणे, अहिल्यानगर भागातील शेतकरी चाळ करून कांदा ठेवतात. दर वाढल्यानंतर विक्रीला आणतात. यंदा सोलापूर जिल्ह्यातही उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने सोलापूरच्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा आहे. मात्र, दरच वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सोलापुरात आता कांद्याची आवक पुन्हा वाढू लागली आहे. उन्हाळी कांदा आता विक्रीला येत आहे. चांगला मालही येत आहे. चांगल्या मालाला ३२०० ते ३५०० रुपयांचा दर आहे. सरासरी दरही चांगला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता कांदा पूर्णपणे वाळवून आणावा. - नामदेव शेजाळ, कांदा विभागप्रमुख, बाजार समिती
अधिक वाचा: Ujani Dam Water Level : उजनीतून ६ हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू; सध्या धरणात किती पाणीसाठा?