Join us

Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत हमाल-तोलार संपावर आज तोडगा निघणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:48 AM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजाराकरिता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे, यांसह अन्य मागण्यांसाठी हमाल-तोलार यांनी मंगळवारी संप पुकारला होता.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजाराकरिता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे, यांसह अन्य मागण्यांसाठी हमाल-तोलार यांनी मंगळवारी संप पुकारला होता.

त्यामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता, तर भुसार मार्केटमध्ये आवक असल्याने शेतकरी आणि वाहनचालकांनीच माल उतरविला. त्यामुळे भुसार मार्केटमध्ये लिलाव झाला. प्रशासक मोहन निंबाळकर यांच्याकडे बुधवारी बैठक होणार आहे.

त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्हा हमाल मापाडी, माथाडी, श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्या वतीने विविध मांगण्यासाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

हमालांच्या मागण्या काय आहेत- संपूर्ण माथाडी कामागाराच्या हमाली तोलाईचा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे.माथाडी कामगारांकरिता, घरकूल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे.कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करू नये.भुसार व कांदा विभागामध्ये ५० किलोच्या भरतीचे नियमन असताना शेतकरी ६०, ७०, ८० किलो भरतीचे पोते बाजारात आणत आहेत, ते त्वरित बंद झाले पाहिजे.अशा विविध मागण्या या आंदोलनामध्ये हमाल तोलार कामगारांनी मांडल्या आहेत.

मंगळवार हमाल संपावर असल्यामुळे कांदा लिलाव बंद होता. बुधवारी लिलाव सुरू होणार आहे. मात्र, जवळपास ५०० हमाल-तोलार संपावर आहेत. त्यामुळे कांदा लिलावासाठी हमाल मिळणे अवघड आहे, मात्र, काही संघटनांनी काम करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.

शेतात पावसांची चिंता.. मार्केटमध्ये संपाचा फटकाउडीद, मूग, सोयाबीन काढणीवेळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उघडीप दिल्यानंतर शेतकरी रास करून माल मार्केटमध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहे. शेतात ठेवल्यास भिजून जाण्याची भीती आहे, तर इकडे मार्केटमध्ये हमाल संपावर असल्याचे विक्रीसाठी आणलेला माल उतरविण्यास कोणी नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थिती प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

कांदा लिलाव मंगळवारी बंद ठेवण्यात आलेला होता. मात्र, बुधवारी हमाल-तोलारांची बैठक प्रशासक निंबाळकर यांच्याकडे होणार आहे. त्यामुळे कांदा लिलाव सुरळीत होणार आहे. हमालांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख

हमाल-तोलार बेमुदत संपावर आहेत. या संपात सुमार ५०० हमाल-तोलार सहभागी आहेत, बुधवारी कांदा लिलाव होणार असल्याचे सांगण्यात आले. या मागण्यांवर वेळीच तोडगा निघणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळता येणार आहे. - शिवाजी पुजारी, माजी संचालक

टॅग्स :कांदाबाजारसोलापूरमार्केट यार्डशेतकरीशेतीपीकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकामगार