Join us

सोलापूर बाजार समितीत ६०० कांदा गाड्याच यार्डात सोडण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 2:21 PM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडल्याने शेतकऱ्यांना त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दररोज ६०० गाड्याच यार्डात सोडण्याचा निर्णय झाला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडल्याने शेतकऱ्यांना त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दररोज ६०० गाड्याच यार्डात सोडण्याचा निर्णय झाला. अतिरिक्त गाड्या गेटच्या बाहेर जनावरांच्या बाजारात व ऑइल मिलच्या जागेत लावण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या बैठकीत ज्येष्ठ संचालक बाळासाहेब शेळके, व्यापारी संचालक केदार उंबरजे, बसवराज इटकळे, शिवाजी पुजारी, सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह कांदा व्यापारी असोसिएशन, भुसार व्यापारी असोसिएशन व हमाल कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली. बाजार समितीच्या चुकीच्या नियोजनाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी दुपारी बाजार समितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कांदा व्यापारी, भुसार व्यापारी व हमाल, कामगार यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

पुढील महिनाभर कांद्याची आवक मोठी असणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम उद्भवणार आहे. यावर उपाय म्हणून दररोज ६०० गाड्याच मार्केट यार्डात लिलावासाठी सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यावरही जर गाड्या आल्या तर त्या गाड्यांना टोकन नंबर देऊन बाजार समितीच्या बाहेरील भागात असलेल्या जनावर बाजारात आणि ऑइल मिलच्या खुल्या जागेत लावण्याची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना पाण्याची व शौचालयाची सोय करण्याच्या सूचनाही यावेळी बाजार समितीच्या प्रशासनाला देण्यात आल्या.

मागील आठ-दहा दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजार समितीत मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचाच त्रास शेतकऱ्यांना व इतर व्यापाऱ्यांना होत आहे. आवक वाढल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी एक दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णय घेतला, मात्र, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

भुसार व्यापाऱ्यांना त्रास नकोकांद्याची आवक वाढल्यानंतर संपूर्ण बाजार समितीत कांद्याच्या गाड्याच लावल्या जातात. मिळेल त्या जागेवर कांदा उतरून लिलाव करतात. भुसार व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरही कांद्याची थप्पी लावत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे भुसार व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील काही दिवस कांद्याची आवक मोठी असणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत चर्चा झाली. आवक वाढल्यामुळे दर पडू नयेत, यासाठी दररोज सहाशे गाड्याच लिलावासाठी घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनीही अंदाज घेऊनच माल विक्रीसाठी आणावा. - केदार उंबरजे, व्यापारी संचालक, बाजार समिती

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी