मागील दहा दिवसांपासून सोलापूरबाजार समितीत कांद्याचा दर वाढत गेला आहे. पाच हजारांवरून बुधवारी ६००० रुपये आणि गुरुवारी ७००० रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी मात्र चक्क दर ८५०० रुपयांवर पोहोचला. बुधवारपासून चार दिवसांतच कांद्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सरासरी दरही साडेचार हजार रुपये मिळत आहे. यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने करपून गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे.
आज कांद्याची आवक २६० ट्रक दिसून आली. त्यामुळे दिवाळीनंतर हा दर दहा हजारांवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोलापूरबाजार समितीत कांद्याचा वर्षभर लिलाव असतो. जानेवारी ते एप्रिलपर्यंत सरासरी ५०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक असते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात कांद्याचा दर पडल्याने शासनाकडून अनुदान मिळाले. मागील दहा दिवसांत कांद्याचा दर पाच हजारांवर होता. मागील महिन्यात ३००० ते ३५०० रुपये दर होता. दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशीच अचानक सहा हजारांचा पल्ला गाठला. दररोज १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक असताना शनिवारी २६० ट्रकवर पोहोचली. त्यामुळे लिलावात लाल कांद्याला कमाल ८५०० रुपयांचा दर मिळाला.
आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ आदी राज्यांतून कांद्याची मागणी वाढली आहे. बंगळुरू मार्केटमध्येही आवक घटली आहे. सोलापुरातही आवक कमी आहे. त्यामुळे जोपर्यंत नवीन कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत दर वाढतच राहणार आहे. पुढील काही दिवसांत दर दहा हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. - नशीर खलिफा, कांदा व्यापारी, सोलापूर