Join us

मोंढ्यात ज्वारी खातेय भाव; गहूही वधारला, आवक मंदावल्याने झाली दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:43 AM

सोयाबीन मात्र पडत्या भावात

हिंगोली येथील मोंढ्यात मागील पंधरवड्यापासून ज्वारीचे दर वधारले असून, एक क्विंटल ज्वारीसाठी दोन हजार ते ४ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत, तर गव्हाच्या भावातही दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. सोयाबीन मात्र पडत्या भावात जात असून, शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे.

मोंढ्यात सध्या गव्हाची आवक सरासरी ८० ते १०० क्विंटल होत आहे, तर ज्वारी १५ ते २० क्विंटल विक्रीसाठी येत आहे. रब्बीच्या पेरणीदरम्यान दोन्ही शेतमालाची आवक मंदावली होती. आता मात्र पेरणी अटोपल्यामुळे शेतकरी शिल्लक ज्वारी, क ज्वारी, गहू विक्रीसाठी आणत आहेत. सध्या गव्हाला सरासरी २ हजार ७०० तर ज्वारीला सरासरी 3 हजार रूपये भाव मिळत आहे.

ज्वारीपेक्षा गव्हाला दिली जातेय पसंती...

सध्या बाजारात ज्वारीचे भाव कडाडल्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांकडून गव्हाला पसंती दिली जात आहे. शेतकऱ्यांकडे नवीन ज्वारी, गहू यायला जवळपास तीन महिन्यांवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात गहू, ज्वारीचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

खुल्या बाजारात ज्वारीसाठी मोजा पाच हजार...

मोंढ्याच्या तुलनेत खुल्या बाजारात ज्वारीचा भाव अधिक आहे. नागरिकांना मोंढ्यात ज्वारी सरासरी ३ हजार रुपये क्विंटलने उपलब्ध होऊ शकते, परंतु, खुल्या बाजारात एक क्विंटल ज्वारीसाठी पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. गव्हाचा भावही खुल्या बाजारात मोंढ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे बहुतांश नागरिक मोंढ्यातूनच गहू, ज्वारी खरेदी करण्याला पसंती देत आहेत.

टॅग्स :ज्वारीसोयाबीनशेती क्षेत्र