Join us

आंबट चिंच शेतकऱ्यांसाठी ठरतेय गोड; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:43 AM

सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनूस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतकऱ्याच्या चिंचेस प्रति क्विंटल रु. ५३०० रुपये उच्चांकी दर मिळाला.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार येथे चिंच लिलावाची सुरुवात शनिवारी (दि. २४) सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांच्या हस्ते करण्यात आली. सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनूस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतकऱ्याच्या चिंचेस प्रति क्विंटल रु. ५३०० रुपये उच्चांकी दर मिळाला.

अलिबाग येथील खरेदीदार बाळासो चोरगे यांनी सदर चिंच घेतली. तसेच लिलावात अखंड चिंचेस प्रति क्विंटल दर किमान रु. २१०० तर सरासरी दर रु. ३३०० निघाले. फोडलेल्या चिंचेस प्रति क्विंटल कमाल दर रु. १२,००० तर सरासरी दर प्रति क्विंटल रु. १०,००० मिळाला.

तसेच चिंचोक्यास प्रति क्विंटल रु. २,१२१ ते २,३०० दर मिळाला. शेतकऱ्यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवून व चांगल्या पॅकिंगमध्ये आणावी, असे आवाहन चिंच उत्पादक शेतकऱ्यांना बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सुपे उपबाजार ही चिंच लिलावासाठी प्रसिद्ध अशी जुनी बाजारपेठ आहे. त्यामुळे बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापूर, भोर इत्यादी तालुक्यांतून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतून शेतकरी चिंच विक्रीसाठी दरवर्षी येथे येत असतात.

चिंचेचे लिलाव दर शनिवारी सकाळी ११:०० वाजता सुरू होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली चिंच लिलावापूर्वी विक्रीस आणावी. चिंच खरेदीसाठी बारामती, पुणे, बार्शी, तुळजापूर, लातूर, औरंगाबाद, अलिबाग तसेच हैदराबाद या भागातून खरेदीदार येत असतात.

शेतमालाचा लिलाव हा उघड लिलाव पद्धती तसेच शेतमालाचे वजनमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर लिलावापूर्वी होत असल्याने स्पर्धा होऊन चिंचेस चढा दर मिळत आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी चिंचेस जादा दर मिळत आहे तसेच आणखी दर वाढतील, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. यावेळी बारामती बाजार समितीचे सदस्य सतीश जगताप, अरुण सकट व सुपे व्यापारी अध्यक्ष सुभाष चांदगुडे तसेच व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :शेतकरीबाजारमार्केट यार्डबारामतीफळेपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती