वाशिम : दिवाळीच्या तोंडावर बाजार समितीत आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. सोयापेंडेच्या दरात घसरण झाल्याने सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला असून, येत्या काही दिवसांत आवक वाढल्यास सोयाबीनचे दर आणखीनच घसरण्याची शक्यताही बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
सद्यःस्थितीत राज्यात सोयाबीनची काढणी वेगात सुरू असून, सोयाबीनच्या उत्पादनात यंदा ३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बाजारात यंदा सोयाबीनची आवक अधिक राहणार आहे. सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३ हजार २४ रुपये एवढे, तर सोयापेंडेचे दर २ हजार ६०४ रुपये प्रती क्विंटल आहेत. अर्थात भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेचे दर खूप कमी आहेत. त्यामुळे आयात वाढण्याचा धोका आहे. अशात सोयाबीनचे दर येत्या काही दिवसांत आणखीनच घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्राने सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाहीच, उलट तेलाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसत असून, तेलाचे दर दिवाळीच्या तोंडावर आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
सोयाबीनला बाजारात कोठे किती कमाल दर
वाशिम | ४४४५ |
बुलढाणा | ४४०० |
वर्धा | ४५०० |
अमरावती | ४४११ |
अकोला | ४५३० |
चंद्रपूर | ४४०० |
जळगाव | ४४०० |
यवतमाळ | ४४४० |
सांगली | ४९०० |
लातूर | ४४९१ |