सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरलेल्या मे महिन्यात देशात सोयाबीन तेलाचे (Soybean oil extraction) गाळप तुलनेने चांगले झाले आहे. इतकेच नव्हे, तर सोया पेंडच्या निर्यातीतही वाढ नोंदविण्यात आली आहे. सोयाबीन काढणीनंतर अनेक शेतकऱ्यांनी चांगला बाजारभाव मिळण्यासाठी सोयाबीन (Soybean future market price) घरात साठवून ठेवले आहेत. त्यांच्यासाठी ही आशा पल्लवीत करणारी बातमी आहे.
प्राप्त अहवालानुसार मे महिन्यात सोयाबीन तेल गाळपात वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये सोयाबीनच्या गाळपात घट झाली होती. चालू तेल वर्षाच्या पहिल्या ८ महिन्यांत (ऑक्टोबर ते सप्टेंबर) सोयाबीनचे गाळपही चांगले झाले आहे, तर. मे महिन्यात सोयापेंडीच्या निर्यातीतही वाढ झाली आहे.
सोयाबीन गाळप का वाढले?
सोयाबीन उद्योगातील अग्रगण्य संस्था सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा) च्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या तेल वर्षाच्या मे महिन्यात ९.५० लाख टन सोयाबीनचे गाळप झाले. जे सुमारे १९ टक्के अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८ लाख टन गाळप झाले. मे महिन्यात सोयाबीनचे गाळप एप्रिलप्रमाणेच होते, तर एप्रिलमध्ये वार्षिक आणि मासिक आधारावर सोयाबीनचे गाळप घटले होते. मे महिन्यात सोयाबीन गाळपात सुधारणा दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोयाबीनचे गाळप वाढण्याचे कारण म्हणजे सोया पेंडच्या मागणीत झालेली सुधारणा.
सोयाबीनचे किती गाळप झाले
दरम्यान SOPAने दिलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर-मे या कालावधीत ८६.५० लाख टन सोयाबीनचे गाळप झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीतील ८३.५० लाख टन सोयाबीनच्या गाळप झाले होते. म्हणजे यंदा तुलनेत ३.५० टक्के अधिक आहे गाळप आहे. SOPA नुसार, चालू तेल वर्षात १२० लाख टन सोयाबीनचे गाळप होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या तेल वर्षात गाळप झालेल्या ११५ लाख टनांपेक्षा ५.७५ टक्के अधिक आहे.
याशिवाय चालू तेल वर्षाच्या मे महिन्यात १.१८ लाख टन सोया केकची निर्यात झाली होती, तर गेल्या वर्षी मे महिन्यात १.१६ लाख टन केकची निर्यात झाली होती. साहजिकच, मे महिन्यात सोया केकच्या निर्यातीत सुमारे २ टक्के वाढ झाली आहे, तर एप्रिल महिन्यात सोया केकची निर्यात वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी कमी झाली होती.
देशात आणि राज्यातील सोयाबीनची स्थिती
सोयाबीन तेल प्रक्रिया उद्योजकांच्या संघटनेकडून प्राप्त माहितीनुसार २०२३मध्ये देशात साधारणत: ११८.५ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. त्यात सर्वाधिक वाटा ५२ लाख हेक्टरसह मध्यप्रदेशचा आणि त्या खालोखाल अनुक्रमे ४५.६ लाख हेक्टर व ११ लाख हेक्टरसह महाराष्ट्र व राजस्थानचा आहे. महाराष्ट्राची सोयाबीन उत्पादकता हेक्टरी सरासरी १०२८ किलो अशी आहे, तर देशाची सरासरी उत्पादकता हेक्टरी हजार किलो अशी आहे. त्यानुसार देशात ११८.७४१ लाख मे. टन सोयाबीनचे उत्पादन झाले.
दरम्यान पुणे येथील कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या अहवालानुसार यंदा सोयाबीनचे उत्पादन ११० लाख मे. टन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.( त्यासाठी WASDE, USDA यांच्या मे २४च्या अहवालाचा संदर्भ घेण्यात आला आहे.) असे असले तरी अमेरिक कृषी विभागाच्या अहवालानुसार जागतिक बाजारपेठेत सोयाबीनचे उत्पादन या वर्षी ४.५६% वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २२-२३ साली हे उत्पादन ३७८२लाख मे. टन होते. यंदा ते ३९७० लाख मे. टन असेल असा अंदाज आहे.
सोयाबीनच्या किंमती वाढणार का?
सध्या २०२३-२४सालासाठी सोयाबीनचा हमीभाव ४६०० रु. प्रति क्विंटल असा आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२३साली जुलै ते सप्टेंबर या काळात ४८७६ रुपये प्रती क्विंटल अशा होत्या. बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे यांनी दिलेल्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर २०२४ या काळात सोयाबीनच्या किंमती ४४०० ते ५२०० रुपये प्रति क्विंटल इतक्या असतील.
या क्षेत्रातील बाजार विश्लेषकांच्या अंदाजानुसार मागील वर्षीचा हवामानाचा फटका आणि कमी बाजारभाव असा अनुभव लक्षात घेता यंदा सोयाबीनकडे अनेक शेतकरी पाठ फिरवू शकतात. त्यामुळेच यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसं झालं तर सोयाबीनच्या कमीत कमी किंमतीत कदाचित आधारभूत किंमतीपेक्षा वाढ होऊ शकते , असे जाणकार सांगत आहेत.