वाशिमच्या बाजारात यंदाच्या हंगामातील सोयाबीन गौरी विसर्जनाच्या दिवशी गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. नव्या सोयाबीनच्या खरेदीचा मुहूर्त उत्साहात पार पडला.
मुहूर्ताच्या खरेदीतच सोयाबीनची व्यापाऱ्यांकडून ५ हजार ५५५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यंदाच्या खरिपात सुरुवातीच्या काळात पेरणी झालेले सोयाबीन आता काढणीवर आले आहे.
अशातच गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी विशाल नारायण नंदापुरे यांनी यंदाच्या हंगामातील सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत आणले.
मुहूर्ताच्या वेळी त्यांच्या सोयाबीनची ५ हजार ५५५ रुपये दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आणि विशाल नारायण नंदाप्रे यांचा वाशिम बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन चव्हाण यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे सचिव वामन सोळंके, निरीक्षक उमेश मापारी, मोहन भालेराव, सुमीत गोटे यांच्यासह व्यापारी, आडते, हमाल, मापारी, मदतनीस आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
यंदाच्या हंगामात चांगले दर मिळण्याची अपेक्षा
जिल्ह्यात यंदाही २ लाख ९९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. वारंवार अतिपावसाचा फटका बसल्याने या पिकाचे मोठे नुकसान झाले. गेल्यावर्षी सोयाबीनला खूपच कमी दर मिळाले होते.