सोयाबीनचे दर घसरलेले असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी घरीच साठवणूक केली आहे. मात्र, आता दरात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, बाजारातसोयाबीनची आवक वाढली आहे. सोबतच हरभऱ्याच्या दरामध्ये मागील पंधरा दिवसापासून घसरण होत असून, तुरीचे दर मात्र स्थिर आहेत.
राज्यात साठवणूकीचा सोयाबीन आता पुन्हा बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जाऊ लागला आहे. अमरावती बाजारपेठेत आज सकाळच्या सत्रात ४५१२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
उदगीर परिसरातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून असलेल्या सोयाबीनच्या दरात दिवाळीपासून घसरण होत आहे. दिवाळीपासून आतापर्यंत सोयाबीनच्या दरामध्ये प्रती क्विंटल ८०० रुपयांची घसरण झालेली आहे. मागील वर्षीसुद्धा दर स्थिर असल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन दर वाढतील या अपेक्षेने विक्री न करता घरीच ठेवले होते. परंतु, दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरात घसरण होत चालल्यामुळे आता शेतकऱ्याचा संयम सुटलेला आहे.
केंद्र सरकारने बाहेर देशातून खाद्य तेलावर आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. याचा परिणाम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. बाहेर देशातून आयात होणारे खाद्यतेल कमी किमतीमध्ये व्यापाऱ्याकडे उपलब्ध होत असल्याकारणाने स्थानिक खाद्यतेलाच्या मागणीवर त्याचा परिणाम झालेला आहे असे व्यापारी सांगत आहेत.
तर दुसरीकडे सोयाबीन पेंडीला पोल्ट्री व्यावसायिकांकडून मागणी कमी असल्याने सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घट होत आहे. पुढील काही दिवसात लग्नसराई, पाडव्याचा सण, शेतीच्या मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने आता त्यांना सोयाबीन विक्री शिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मागील चार दिवसांपासून उदगीर मार्केट यार्डामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. आवक वाढून सुद्धा दर मात्र ४ हजार ४५० रुपयेच मिळत आहे. या भागातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला कवडीमोल दराने विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्याच्या अर्थकारणावर फार मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे.