Join us

Soybean Bajar Bhav : बार्शी बाजार समितीत नवीन सोयाबीनची ५ हजार कट्टे आवक.. कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:04 PM

भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात पाच ते ६ हजार कट्टे सोयाबीनची आवक झाली आहे

बार्शी : भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात पाच ते ६ हजार कट्टे सोयाबीनची आवक झाली आहे.

प्रतिक्विंटल कमीत कमी ४००० ते ४७०० रुपये दर मिळत आहे. सोयाबीनसोबतच उडदाची ही आवक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. उडदामध्ये हलक्या प्रतीच्या मालाला ६५००, मध्यम मालाला ७०००, तर उच्च प्रतीच्या मालाला ७८०० रुपये दर मिळत आहे.

बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे म्हणाले, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभर कोणत्या ना कोणत्यानुसार मालाची आवक सुरूच असते मागील वीस दिवसांपासून यंदाच्या खरीप हंगामातील नवीन उडदाची आवक सुरू झाली आहे.

सुरुवातीला १ हजार कट्टे असलेली हळूहळू वाढत गेली. यंदाच्या वीस दिवसांत साधारणपणे अडीच लाख कट्टेपेक्षा जास्त आवक झाली आहे. शुक्रवारी ही बाजारात उडदाची १९ ते २३ हजार कट्टे आवक झाली आहे.

आवक सुरू झाली तेव्हा ८००० ते ८८०० पर्यंत दर होता. मागील दहा दिवसांत ऐन काढणीदरम्यान पाऊस पडल्याने उडीद भिजला काढणीही लांबली त्यामुळे भाव काहीसे पडले गेले.

व्यापाऱ्यांचा ही अंदाज चुकला. मात्र, नंतर पाऊस उघडल्याने चांगला माल आला व भाव हळूहळू वाढत गेला. गेल्या दोन दिवसांत ३०० ते ५०० रुपये दर वाढले आहेत.

उडदासोबत सोयाबीनचीदेखील सुरु झाली आहे. पहिल्या मुठीची पेर झालेल्या आणि हलक्या रानातील सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे त्याचा काढणीवर परिणाम होऊ शकतो. पुढील आठ दिवसांपासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. सीझनमध्ये म्हणजे १५ दिवसांनंतर दररोज एक लाखापेक्षा जास्त कट्टे आवक होईल. - विजय राऊत, प्रशासक, बार्शी बाजार समिती

मध्य प्रदेशातही पाऊस पडल्याने तिकडेही माल खराब झाला, त्यामुळे दर वाढला आहे. आता आपल्या बाजारात चांगल्या मालाला ७२०० ते ७८०० प्रतिक्चिटल दर मिळत आहे. - सचिन मडके, खरेदीदार

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतकरीशेतीबार्शीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीक