Join us

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय; दर मात्र 'जैसे थे' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 1:21 PM

बाजार समित्यांत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : 

वाशिम :  दिवाळीचा सण तोंडावर असल्याने शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर भर देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी (२४ ऑक्टोबर) जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समित्या आणि उपबाजार मिळून २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. 

यंदाच्या खरीप हंगामात प्रत्यक्ष २ लाख ९९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जुलैपासून वारंवार होत असलेल्या पावसामुळे या पिकावर मोठा परिणाम झाला. 

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने या पिकाचे मोठे नुकसानही झाले आहे. आता या पिकाची कापणी आणि काढणी अंतिम टप्प्यात असून, काढणी झालेले सोयाबीन शेतकरी विक्रीस काढत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढली आहे.

गुरुवारी (२५ ऑक्टोबर) रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांत २० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. प्रामुख्याने कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर या बाजार समित्यांत सोयाबीनची आवक अधिक होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत असून, येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बाजार समित्यात सोयाबीनची आवक आणखीच वाढणार आहे.

पुढील आठवड्यात आवक आणखी वाढणार

दिवाळीचा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासह देणी, घेणी करण्यासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत असून, येत्या काही दिवसांत बाजार समित्यांत सोयाबीनची आवक आणखीच वाढण्याची शक्यता आहेत.

कारंजात १२ हजार क्विंटल

कारंजा बाजार समितीत या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. सोमवारी या बाजार समितीत ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने मालाचा निपटारा करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने मंगळवार आणि बुधवारी या बाजार समितीत सोयाबीनचा लिलाव आणि खरेदीही बंद ठेवली. त्यानंतर गुरुवारी या बाजार समितीत तब्बल १२ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

कोणत्या बाजार समितीत किती क्विंटल आवक?

बाजार समितीआवक (प्रती क्विंटल)
कारंजा                  १२०००
वाशिम                    ५८००
मानोरा                    १५००
मंगरुळपीर              २०००
शिरपूर                      ७००
मालेगाव                    १२००
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्ड