Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला शासनाचा हमीभाव दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:36 PM

केंद्र सरकारने शेतीमालाला हमीभाव (किमान आधारभूत किंमत) निश्चित केला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात त्यापेक्षा कमी भाव पडतो.

राजाराम लोंढे कोल्हापूर : केंद्र सरकारने शेतीमालाला हमीभाव (किमान आधारभूत किंमत) निश्चित केला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात त्यापेक्षा कमी भाव पडतो.

सोयाबीनचा प्रतिक्विंटल ४८९२ रुपये हमीभाव असला, तरी सरासरी ४२५० रुपयांनी विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाचा नुसताच हमीभाव, दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

यंदा शासनाने सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल २९२ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

शासनाने हमीभावात वाढ केली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात किती भाव पडतो, हा संशोधनाचा विषय आहे. सोयाबीनला दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील क्षेत्र कमी होत आहे. यंदा जेमतेम ४२ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

पाऊस जास्त राहिल्याने सोयाबीनचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होणार आहे. बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू झाली आहे मात्र, हमीभावा एवढेही पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

व्यापारी सोयाबीनचा दर ओलाव्यावर निश्चित करतात, ओलावा अधिक असेल तर दर कमी मिळतो. ओलाव्याच्या आडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

दरासाठी १० टक्के ओलाव्याचे मापदंडसोयाबीनचा दर त्याच्या ओलाव्यावर ठरवला जातो. किमान १० टक्के ओलावा म्हणजे पूर्णपणे वाळलेले सोयाबीन असे समजले जाते. ओलाव्याच्या मापदंडानुसार व्यापारी दर निश्चित करतात.

एकरी जेमतेम ८ क्विंटलचे उत्पादनसध्याच्या दरानुसार शेतकऱ्यांच्या पदरात ३४ हजार रुपये पडतात. त्यातून मशागत, बियाणे, काढणी व मजुरी यासाठी किमान २८ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे एकरी सहा ते सात हजार रुपयेच शेतकऱ्यांच्या हातात राहतात.

सध्याचा व्यापाऱ्याकडील दरओलावा (दर प्रतिक्विंटल)१० - ४४००११ - ४३६०१२ - ४३१२१३ - ४२६८१४ - ४२२४

तेलापेक्षा पेंडीवर ठरतोय सोयाबीनचा दर सोयाबीनपासून तेल काढले जात असले, तरी तेलाच्या दरावर जरी अवलंबून असला तरी तेलानंतर निघणारी पेंडही महत्त्वाची असते. साधारणतः एक क्विंटल सोयाबीनपासून ८० किलो पेंड मिळते. ही पेंड जनावरांच्या पशुखाद्यात वापरली जाते.

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीसरकारराज्य सरकार