Soybean Bajar Bhav :
वाशिम : केंद्र शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात 'मिल क्वॉलिटी' सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच दिसून येत आहे. बिजवाई (सीड क्वॉलिटी) सोयाबीनच्या दरात मात्र काहीशी वाढ झाली असून, सोमवारी (२१ ऑक्टोबर) वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. दरम्यान, बाजार समितीत विक्रमी आवक झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. बाजार समित्यांत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची खरेदी काही व्यापारी करू लागले आहेत.मागील आठवड्यात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला ४ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले होते. सोमवारी मात्र त्यात अडीचशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आणि बिजवाई सोयाबीनला कमाल ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाला. दरम्यान, 'मिल क्वॉलिटी' सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे. या सोयाबीनला खूप कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
दिवाळीच्या तोंडावर आवक वाढणार !
यंदाच्या हंगामातील सोयाबीनची काढणी वेगात सुरू असून, दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर भर देत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांत या शेतमालाच्या दरात वाढ दिसून येत नसली तरी आवक मात्र वाढत आहे. सोमवारी वाशिम बाजार समितीत ७ हजार ३६० क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
सोयापेंडच्या दरातील घसरणीचा परिणाम
मागील काही दिवसांपासून सोयापेंडच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसत असून, देशांतर्गत बाजारपेठेतही सोयाबीनचे दर दबावातच असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ऐन दिवाळीच्या तोंडावर घोर निराशा होत आहे.
'मिल क्वॉलिटी' सोयाबीनला कोठे किती दर ?
वाशिम | ३,७३० | ४,३५५ |
कारंजा | ३,५५० | ४,२५० |
मानोरा | ३,८५० | ४,६०० |
मंगरुळपीर | ३,५०० | ४,६२५ |
रिसोड | ३,५५० | ४,३५० |