बार्शी : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते व्यस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये मात्र 'कही खुशी, कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली आहे.
यावर्षी पाऊस जास्त पडून सोयाबीनचे नुकसान झाले असले, तरी सोयाबीनला उतारही चांगला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीपूर्वी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होती.
दिवाळीच्या मुहूर्तावर निघालेल्या सौद्यामध्ये सोयाबीनचा दर हा ४००० पासून ४४५० पर्यंत गेला होता. पाडव्या दिवशी ४४५० प्रति क्विंटलने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, त्यानंतर तीन-चार दिवसात हळूहळू दररोज शंभर २०० ने दर कमी होत गेले.
मंगळवारी सोयाबीनचे दर ४१५० रुपयावर स्थिरावले आहेत. ३६०० रुपये पासून माल पाहून ४१५० रुपयापर्यंत दर मिळत आहे बाजारात सध्या सहा ते सात हजार कट्टे सोयाबीनची आवक दररोज होत आहे.
बाजारात भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात न आणता मोठ्या प्रमाणात घरीच ठेवणे पसंत केले आहे. कित्येक शेतकऱ्यांनी मधल्या काळात पाऊस पाऊस असल्याने व शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने सोयाबीन काढून शेतात तसेच ठेवलेले आहे.
यासोबतच डीओसीच्या दरातही घसरण झाल्यामुळे सोयाबीनचे भाव उतरले असल्याचे सोयाबीन खरेदीदार अजय काळदाते यांनी सांगितले.