Join us

Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 9:53 AM

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्यात खरीप हंगामात उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी पिकांची पेरणी होते. मागील काही वर्षांत उत्पादनखर्च वाढला असून, अपेक्षित दर, नैसर्गिक आपत्ती आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत आहे. यंदा केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे.

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला अद्याप विक्रीला आणलेला नाही. काही शेतकरी गरजेपुरता किरकोळ माल विक्रीला घेऊन येत आहेत. परंतु ओला माल खरेदी करायला व्यापारी नकार देत आहेत. 

जामखेड तालुक्याला ज्वारी आणि उडदाचे कोठार मानले जाते. उत्तरप्रदेश, इंदौर, तामिळनाडू, आंद्रप्रदेश येथील व्यापारी उडीद, ज्वारीची खरेदीसाठी जामखेड बाजार समितीत येत असल्याने शेतमालाला चांगला भाव मिळतो.

शेजारील आष्टी, पाटोदा, भूम, परांडा, करमाळा येथील शेतकरी जामखेडमध्ये माल विक्रीसाठी आणतात. सध्या मार्केटमध्ये गेल्यावर्षीची ज्वारी आणि यंदाच्या हंगामातील उडीद, मूगाची मार्केटमध्ये आवक होत आहे. चांगल्या ज्वारीला पाच हजार तर किडलेल्या ज्वारीला २२०० ते २५०० रुपये भाव मिळतो आहे.

मार्केटमधील प्रति क्विंटल दरज्वारी -३००० ते ४७०० रुपये.उडीद - ७५०० ते ८००० रुपये.गहू - २८०० ते ३२०० रुपये.सोयाबीन - ३८०० ते ४००० रुपये.हरभरा - ६५०० ते ७००० रुपये.बाजरी - २५०० ते ३००० रुपये.मूग - ८००० ते ८५०० रुपये.

तीन निकषांच्या आधारे भावमॉईश्चर (आद्रता किंवा ओल)■ फॉरेन मॅटर (माती, काडी, कचरा, दगड)■ डॅमेज (दागी, काळे पडलेले, सुरकुत्या पडलेले, पावसाने भिजलेले)

यंदा जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मूग, उडीद आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ओला माल घेण्यास व्यापारी नकार देत आहेत. परंतु सुकलेला माल असल्यावर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. - भरत शिंदे, आडते व्यापारी, जामखेड

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतीशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीज्वारीमूग