कोल्हापूर : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन वर्षांपासून दरात मोठी घसरण झाली असून, हमीभावाच्या खाली दर आले आहेत.
केंद्र सरकार दरवर्षी २२ खरीप व रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत निश्चित करते. मागील खरीप हंगामात सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ४६०० रुपये होता, तो २०२४-२५ हंगामासाठी ४८९२ रुपये केला.
मात्र, प्रत्यक्षात बाजारात शेतकऱ्यांच्या पदरात सरासरी ४३०० रुपयेच पडतात, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने कमी दराने विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे गेली नऊ महिने सोयाबीन घरातच ठेवले आहे.
गेल्या दहा दिवसांत असे राहिले सोयाबीनचे दर
२१ ऑगस्ट - ४२७०
२२ ऑगस्ट - ४२७०
२३ ऑगस्ट - ४३००
२४ ऑगस्ट - ४३२०
२५ ऑगस्ट - ४३१०
२६ ऑगस्ट - ४३५०
२७ ऑगस्ट - ४३५०
२८ ऑगस्ट - ४३८०
२९ ऑगस्ट - ४३७०
३० ऑगस्ट - ४३६५
३१ ऑगस्ट - ४३८०
असे आहेत सरकारने निश्चित केलेले हमीभाव (प्रतिक्विंटल)
पिक | हंगाम २०२३-२४ | हंगाम २०२४-२५ |
भात | २१८३ | २३०० |
हायब्रीड ज्वारी | ३१८० | ३३७१ |
मालदांडी ज्वारी | ३२२५ | ३४२१ |
मका | २०४० | २२२५ |
तूर | ७००० | ७५५० |
मूग | ८५५८ | ८६८२ |
मुगाच्या दरातही घसरण
केंद्र सरकारने मुगासाठी हमीभाव निश्चित केला आहे. मागील हंगामासाठी तो प्रतिक्विंटल ८५५८ रुपये होता, चालू हंगामासाठी ८६८२ रुपये केला आहे. पण हमीभावापेक्षा कमी दराने म्हणजेच घाऊक बाजारात ८२५० रुपयांपर्यंत विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे.
गेली दोन वर्षे सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, शासनाने नुसता हमीभाव जाहीर केला, खरेदीचे काय? - दत्तात्रय साळोखे, शेतकरी