लातूर जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनची ओळख असून, सोमवारी लातूर बाजार समितीत १३ हजार ७६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास ४२२६ रुपयांचा कमाल, ३१०१ रुपयांचा किमान तर ४१०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
लातूर बाजार समितीत सोमवारी २०७ क्विंटल गुळाची आवक झाली. त्यास ३५५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. तसेच गहू १४४ क्विंटल २९०० रुपयांचा भाव, रब्बी ज्वारी २८५ क्विंटल आवक, हरभरा १०८५, तूर ७ हजार ९०६, मूग ६८, करडई १३ तर २७८ क्विंटल राजमाची आवक झाली. मागील काही दिवसांपूर्वी तुरीचे दर वधारलेले होते. मात्र, यात घसरण झाल्याने आता ७१०० रुपयांचा भाव मिळत आहे.
सध्या जिल्ह्यातील ५४ हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक बाजार समितीकडे अल्प आहे.
६ फेब्रवारीपर्यंत हमीभाव खरेदी केंद्रांची मुदत असल्याने त्यानंतर मात्र, बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाजारात शासनाने जाहीर केलेला ४ हजार ८९२ रुपयांचा हमीभावही शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
अशी राहिली आवक
• बाजार समितीत १३७६५ क्विंटल सोयाबीनची आचक.
• ७ हजार ९०६ क्विंटल तुरीची आवक.
• १ हजार ८५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली असून, त्यास ६१२५ रुपयांचा दर मिळाला.
सोयाबीनचा दर घसरलेलाच आहे. त्यामुळे शेतात केलेला खर्च हाती येत नाही. नियोजन कोलमडले असून, शेतमालाला वाढीव दर द्यावा. - काका ढोले, शेतकरी, भेटा ता. औसा.
हमीभाव मिळेना; नियोजन कोलमडले...
• जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून, खरिपात सहा लाख हेक्टरवर पेरा असतो. तीन वर्षांपूर्वी ११ हजारांवर दर पोहोचल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळाले. मात्र, मागील दोन वर्षापासून दरात घसरण सुरूच आहे.
• त्यात हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. आगामी काळात शेतीचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न आहे.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी