सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
हमीभाव खरेदी पूर्वी बाजार समितीपुरतीच मर्यादीत असायची मात्र महाकिसान संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातदेखील हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सुरावी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करण्यात येत असून, महाकिसान संघाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे.
हमीभाव योजनेच्या माध्यमातून क्विंटलला ४,८९२ रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. ऑनलाइन नोंदणीची अंतिम दि. १५ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली असल्याची माहिती महाकिसान संघाचे कार्यकारी अधिकारी प्रा. गंगाधर चिंधे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर आपली सोयाबीन नेण्यापूर्वी ऑनलाइल नोंद करणे आवश्यक आहे. सुरावी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ही सुविधा रांजणगाव देशमुखमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
यासाठी सोयाबीन पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व मोबाइल क्रमांक नोंदणी केंद्रावर देणे आवश्यक आहे.
नोंदणी झाल्यानंतर खरेदी केंद्राकडून आपणास सोयाबीन घेऊन येण्याची वेळ दिली जाते. यासाठी सोयाबीनची १२ डिग्रीपर्यंत आर्द्रता निश्चित करण्यात आलेली आहे.
पंधरा दिवसांत रक्कम खात्यात जमा होणारसोयाबीन विक्री केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात, तसेच एक रक्कमी पैसे मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता हमीभाव केंद्रावर आपला माल विकावा व जास्तीचा मोबादला मिळवण्याचे आवाहन महाकिसान संघाचे कार्यकारी संचालक प्रा. गंगाधर चिंधे यांनी केले आहे.