Soybean halad Market :
वसमत :सोयाबीन व हळदीचे दर वाढत नसल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शेतीमालाची आवक कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतीमालाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात हळदीची नेहमीच मोठ्या प्रमाणात आवक असायची. परंतु, सध्या हळदीला प्रति क्विंटल १४ हजारापर्यंत दर मिळत आहेत. त्यामुळे हळदीची आवक कमी प्रमाणात होत आहे. १८ नोव्हेंबर रोजी मोंढ्यात सोयाबीनची ४०० क्विंटलची आवक झाली.
सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार २९० रुपयेप्रमाणे दर मिळत आहे. सोयाबीन व हळदीचे दर वाढत नसल्यामुळे येथील मोंढ्यात आवक कमीच होत आहे. शेतीमालाच्या दरात तेजी येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
१४५० क्विंटल सोयाबीनची खरेदी
कळमनुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत एनसीसीएफ मार्फत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ४५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सातशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू असून दररोज दहा ते बारा शेतकरी सोयाबीन विक्री करण्यासाठी येऊ लागले आहेत.
दररोज दीडशे क्विंटलच्या जवळपास सोयाबीन खरेदी केली जात आहे. एनसीसीएफ मार्फत सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव आहे. बाजारात सोयाबीनला कमी हमीभाव असल्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी एनसीसीएफ मार्फत विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन एनसीसीएफला खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन महेंद्र माने, राघोजी नरवाडे, प्रशांत मस्के, चक्रधर अंभोरे आदींनी केले.
हिंगोलीत 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीला प्रारंभ
हिंगोली : शहरातील गोविंदनगर भागात शासकीय हमीभाव खरेदी व नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मूग ८ हजार ६८२ तर उडीद ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलने 'नाफेड'च्या केंद्रावर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी पीक पेराची नोंद असलेली ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड झेरॉक्स, आधारलिंक असलेले पासबुक लागणार आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन चेअरमन विशालसिंग, सुभोतसिंग, उमेश हजारे, डॉ. भाग्यश्री निळेकर, केंद्रचालक अमोल काकडे यांनी केले आहे.
सोयाबीन पुन्हा साठवण्याची वेळ
सोयाबीनचे दर मागील वर्षभरापासून वाढत नाहीत. सध्या ४ हजार २०० दर मिळत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन विक्रीस नेले नाही. सोयाबीन व हळदीचा साठा आखाड्यावर ठेवला आहे. - कैलास साळुंके, शेतकरी
२० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले आहे. योग्यदर मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन घरी ठेवणे पसंत केले आहे. भविष्यात दर वाढले तर विक्री करणार आहे. - शेख एजाज, शेतकरी