Join us

Soybean kendra : सोयाबीनच्या अडचणी सुटेना ; हमीभाव केंद्रात खरेदी होईना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 4:03 PM

दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकरी नाईलाजास्तव मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री करीत आहेत. (Soybean kendra)

Soybean kendra : 

विनायक चाकुरे

उदगीर : सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनाने तालुक्यात दोन केंद्रे मंजूर केली आहेत. १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदीस प्रारंभ झाला. तालुक्यातील दोन्ही केंद्रांवर एकूण साडेतीन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

परंतु, प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याचा शेतमाल हमीदराने खरेदी केला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दराने धोका दिला आहे. आगामी काळात सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची घरी साठवण केली. मात्र, पदरी निराशाच पडली. किमान यंदा तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल, या आशेने जूनमध्ये वेळेवर झालेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या उत्साहात पेरणी केली. दरम्यान, पिकांपुरता पाऊस झाल्याने पीकही चांगले आले. त्यामुळे चांगले उत्पादन होईल, अशी आशा होती. परंतु, ऐन काढणीच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन डागी बनले. हे सोयाबीन बाजारात विक्रीस नेले असता तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.

ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, असे शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. परंतु ओलाव्याच्या नावाखाली व्यापारी साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत भाव देत आहेत. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे

लागवडीचा खर्च व बाजारात मिळणारा प्रत्यक्ष दर पाहिल्यास शेतकऱ्यांच्या हाती काहीच रक्कम शिल्लक राहत नाही. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकरी नाईलाजास्तव मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री करीत आहेत. उदगीर तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वेळेवर पेरणी झाली. पावसानेही चांगली हजेरी लावल्याने पीक बहरले होते.मात्र, परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान केले आहे. सध्या शेतशिवारात सोयाबीन काढून राशी करण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यास बाजारात हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तालुक्यातील दोन्ही हमीभाव केंद्रांवर एकूण साडेतीन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु, प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याचा शेतमाल हमीदराने खरेदी केलेला नाही.

१ ऑक्टोबरपासून नाव नोंदणी

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. उदगिरातील तालुका खरेदी- विक्री संघ व रंगराव पाटील खासगी बाजार समिती या दोन ठिकाणी नोंदणी चालू आहे. तालुक्यात ३ हजार ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात झाली. परंतु, अद्याप एकाही शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी झाला नसल्याचे दोन्ही केंद्र चालकांनी सांगितले.

सोयाबीन ओलाव्याचे कारण पुढे

सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्यास ते चांगल्या प्रतीचे गणले जाते. परंतु, बाजारात १० टक्क्यांपेक्षा जास्तीचा ओलावा असल्यास शेतकऱ्यांच्या दरात कपात केली जात आहे. सध्या सोयाबीनमध्ये २० ते २२ टक्के ओलावा असल्याचे व्यापारी सांगत आहेत. ओलाव्याचे कारण पुढे करून दरात कपात केली जात असल्याचे शेतकरी सांगतात.

उदगीरच्या बाजारात आवक कमी

दिवसेंदिवस दर घसरत असल्याने शेतकरी गरजेनुसार सोयाबीनची विक्री करीत आहेत. त्यामुळे हंगाम सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असतानाही बाजारात आवक जेमतेम होत आहे.

खरेदीच्या नियमामुळे अडचण

शासनाने हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीन खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, यंदा हेक्टरी १८ ते २० क्विंटल उत्पादन झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे उर्वरित शेतमालाचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

कारखानदारांकडून मागणी कमी

• सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांकडून यंदा सोयाबीनला कमी प्रमाणात मागणी आहे.

• सोया पेंडीस उठाव कमी असल्याने कारखानदारही जेमतेम सोयाबीनची खरेदी करत असल्याने दर दिवसेंदिवस कमी होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड