अहिल्यानगर : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी दिली आहे.
हंगाम २०२४-२५ मूग, उडीद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली आहे.
हंगाम २०२४-२५ साठी मूग या पिकासाठी हमीभाव ८ हजार ६८२ प्रतिक्विंटल, उडीद ७ हजार ४०० प्रतिक्विंटल, तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.
मूग व उडीद पिकांची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी, २०२५, तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते १२ जानेवारी, २०२५ या कालावधीत केंद्रावरून खरेदी करण्यात येणार आहे. सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्डची राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असलेले पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि मूग, उडीद व सोयाबीन पिकाची नोंद असलेला ऑनलाइन पीकपेरा व चालू मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करून सुकवून माल केंद्रावर आणावा. नाफेडच्या एनसीसीएफच्या स्पेसीफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येईल. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसएमएस देऊन खरेदीसाठी बोलावण्यात येईल.
या केंद्रांवर होणार शेतकऱ्यांची नोंदणी• शेवगाव - सुखायू फार्मर प्रोड्यूसर कंपनी,• बोधेगाव - नाथ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, हातगाव• पाथर्डी - जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, मार्केट यार्ड• जामखेड - कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड• कर्जत - कर्जतकर फार्मर प्रोड्यूसर कंपनी, बर्गेवाडी रोड• श्रीगोंदा - शिवदत्त फार्मर प्रोड्यूसर कंपनी, घारगाव | रिअल अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, घुटेवाडी | जय किसान फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मांडवगण• राहुरी - राहुरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ• पारनेर - कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड• राहाता - कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड• कोपरगाव - कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड