पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये माळशेज परिसरात गावागावांतील पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून ओतूर भागाचा विचार केला असता या भागामध्ये यावर्षीचा सोयाबीन काढणीचा हंगाम तोंडावर आला तरी सोयाबीनचे भाव पडलेलेच असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
केंद्राच्या हमीभावाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत फरक पडत नसल्याने सर्व पीक, कडधान्यांचे हमीभाव वाढवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन निघाल्यावर थोडे दिवस पाच हजारच्या पुढे प्रति क्विंटलचे भाव गेले होते. त्यानंतर आता जवळपास सोयाबीन काढणी आली तरी क्विंटलच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
हंगामातील अनेक महिन्यांपासून सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ४७०० ते ४८०० च्या वर वाढलाच नाही. दर वाढेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरी ठेवले. पण त्याचा त्यांना फायदा झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आता भाव वाढण्याची आशा सोडून देऊन विक्रीदेखील केली.
आता पुन्हा सोयाबीन काढणी आली असून सोयाबीनचे भाव 'जैसे थे' आहेत, त्यामुळे नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेती करतानाचे हाल कोण लक्षात घेतो? त्याला कर्ज उपलब्ध करून दिले म्हणून तो शेतीतून प्रचंड नफा कमावेल, हे शासनाचे गणित चुकीचेच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीनला मिळणाऱ्या पाच हजारांच्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. अशीच काहीशी परिस्थिती अन्य कडधान्यांची असून, या धान्यांना भाव वाढवले तरच हा शेतकरी तगेल; अन्यथा आजही शेतकऱ्याची अवस्था वाईट होईल. कीटकनाशकेमेहनतीचा खर्च हे सर्व शेतकऱ्यांनी पणाला लावल्याचे दिसत आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, यावर्षी सोयाबीनला हमीभाव मिळणार का? सोयाबीनचा उच्चांकी दर कितीपर्यंत जाईल व या सोयाबीन पिकापासून आपल्याला फायदा होईल का? असे विचार शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. वास्तविक पाहता २०२२-२३ साली सोयाबीन दर क्विंटलला ४८०० ते ५२०० रुपये तर आतापर्यंत यंदा ४८०० क्विंटल शेवटपर्यंतच गेले.
शेतकऱ्याला क्विंटलला ७००० पर्यंत भाव अपेक्षित होता. पण गेला नसल्याने शेतकरी सरकारच्या धोरणावर नाराज आहेत. आता यावर्षी तरी शेतकऱ्यांना सोयाबीन साथ देईल का? हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेला पाहायला मिळत आहे.
आमच्याशी व्हॉटसअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.
कीटकनाशके, औषध फवारणीचे दर गगनाला
सोयाबीन पिकाचे उत्पादन घेत असताना शेतकरी वर्गाला यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागली आहे. विविध प्रकारची कीटकनाशके फवारणी तसेच अनेक प्रकारची औषधे फवारणी करावी लागली. मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे पाहायला मिळाले. हा झालेला खर्च यावर्षी सोयाबीन पिकाच्या नफ्यासहित परत करणार का व हेच शेतकऱ्याला साथ देणार का? अशा चर्चाचे उधाण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी