Soybean Market :
हिंगोली : खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. परंतु, मागील काही वर्षांपासून सोयाबीनचा लागवड खर्च वाढला असला, तरी अपेक्षित दरवाढ होताना दिसून येत नाही.
परिणामी, सोयाबीन उत्पादक अडचणीत आले असून, यंदा सोयाबीनला अपेक्षित दर मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतात.
मात्र, मागील काही वर्षांपासून एकापाठोपाठ येणारी नैसर्गिक संकटे आणि कवडीमोल दर यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.सोयाबीनच्या लागवडीला लागणारा खर्च आणि त्या तुलनेत मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे.
सध्या बाजारात सोयाबीनला अवघा चार ते साडेचार हजार रुपये दर मिळत आहे. एकेकाळी हक्काचे पीक असलेले सोयाबीन आता चिंतेचा विषय बनला आहे.
हरभरा पाचशेंनी घसरला
येथील मोंढ्यात सप्टेंबरमध्ये हरभऱ्याला ७ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील आठवड्यापासून मात्र दरात क्विंटलमागे जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. ९ ऑक्टोबर रोजी ६ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
६ हजार रुपये दराची मागणी
केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ८८२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे, तरीही हमीभावापेक्षा कमीच दर मिळत आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमीच असून, सोयाबीनला किमान ६ हजार रुपये दर असावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर असावा
बियाण्याचे, खताचे आणि कीटकनाशकांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीनचा लागवड खर्च अधिक होत आहे. त्या तुलनेत दर कमी आहेत. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होत आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता, सोयाबीन दरात वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल
शेतमाल | आवक (क्विं.मध्ये) |
गहू | ५० |
ज्वारी | १९ |
सोयाबीन | ८१५ |
हरभरा | ३१ |
हळद | १००० |
शेतमालाला मिळणारा सरासरी भाव
गहू | २,३०० |
ज्वारी | १,८१५ |
सोयाबीन | ४,२६५ |
हरभरा | ६,५५० |
हळद | १२,४०० |