Soybean Market :वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांत मागील पाच ते सहा दिवसांत सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. त्यात एकट्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ४७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याखालोखाल वाशिम बाजार समितीत आठवडाभरात ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.
बाजार समित्यांच्या आकडेवारीतूनच हे स्पष्ट झाले आहे. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात उत्पादित सोयाबीनसह गेल्या हंगामातील साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्यावर भर दिला होता. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली.गेल्या आठवड्यात कारंजा, वाशिम, रिसोड, मंगरुळपीर या बाजार समित्यांत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मानोरा आणि मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर या उपबाजारांतही सोयाबीनची आवक वाढली.
दिवाळीच्या सणानिमित्त बाजार समित्या आठवडाभर बंद राहतात. त्यामुळे गत आठवड्यापासून शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीवर अधिकच भर दिला. परिणामी सोयाबीनची विक्रमी आवक बाजार समित्यात होत आहे. त्यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या पाच दिवसांतच तब्बल ४७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर वाशिम येथे ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
आठवडाभरात जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटलवर आवक
जिल्ह्यातील केवळ कारंजा बाजार समितीत मागील आठवड्यातील गुरुवार ते सोमवार या पाच दिवसांत ४७ क्विंटल आवक झाली असली तरी जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बाजार समित्यांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सहा बाजार समित्या आणि उपबाजारांत मिळून आठवडाभरात सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे.
दिवाळीनंतर लागणार 'ब्रेक'
दिवाळी सणामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीवर भर दिला आहे. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेत बाजार समित्यांत सोयाबीनचे दर खूप कमी असतानाही आवक वाढली होती. दिवाळीचा सण आटोपल्यानंतर मात्र शेतकरी विक्री थांबवून दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठविण्यावर भर देण्याची शक्यता असल्याने आवक घटणार आहे.
आठवडाभरात कोठे किती क्विंटल आवक?
कारंजा | ४७,००० |
वाशिम | ३६,००० |
रिसोड | १५,००० |
मंगरुळपीर | १३,००० |
मानोरा | ८,००० |