सोयाबीनचा खर्च वाढला; पण दर नाही वाढला, हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री सुरू आहे. चालू हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. खरीप हंगामात सुरुवातीला काही भागात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहे.
यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने मोठा फटका बसत आहे. एका बाजूला उत्पादनाचा खर्च वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत आहे.
आगामी काळात निवडणुका जवळ आल्या आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवणे आवश्यक आहे. आगामी काळात सोयाबीनला जास्त भाव मिळेल, यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा ७९२ ते १ हजार ३९२ रुपये प्रतिक्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे.
यंदा शेतकऱ्यांनी कपाशी पिकापाठोपाठ सोयाबीनची पेरणी केली आहे. गेल्या वर्षी भाव मिळाला नाही. त्यामुळे यंदा चांगला भाव मिळेल, या आशेवरती बळीराजा मशागत करीत आहे.
हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री
१. केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला ४ हजार ८९२ प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना सध्या शेतकऱ्यांना बाजारात ३ हजार ५०० ते ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकावे लागत आहे.
२. खरिपातील मुख्य सोयाबीन पिकाची अद्याप आवक सुरू झालेली नाही. असे असताना आताच दर कोसळलेले आहेत. ही परिस्थिती पाहता प्रत्यक्ष खरीप हंगामातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात जेव्हा बाजारात येईल तेव्हा हे भाव आणखीन खाली जाणार असल्याचे भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सोयाबीनचे हमीदर जाहीर केले असताना हंगामाच्या अगोदरच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ७९२ ते १ हजार ३९२ रुपये प्रतिक्विंटल तोटा घेऊन सोयाबीन विकावे लागत असेल तर ही अत्यंत अन्यायकारक व खेदजनक बाब आहे.
तर शेतकरी सरकार विरोधात भूमिका घेतील
राज्य सरकारने मतदानावर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना आणली आहे. त्यातून निवडणुकांत अपयश झाकले जाईल, अशी अपेक्षा बाळगून आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक सरकार देत आहे.
मागील वर्षाची सोयाबीन भाव वाढेल या अपेक्षेने साठवून ठेवलेला आहे, सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. किमान आधार भावाच्या वर सोयाबीनला भाव मिळेल, यासाठी उपाययोजना गरजेचे आहे. -एल. डी. कोरडे, सोयाबीन उत्पादक शेतकरी
मागील निवडणुकीत कांदा, सोयाबीन उत्पादक व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला आपली जागा दाखवली होती. आगामी निवडणुकांत सोयाबीनचे दर असेच राहिले तर शेतकरी सरकारविरोधात भूमिका घेतील .-राजेंद्र सोनवणे, शेतकरी