Join us

Soybean Market : शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नावालाच; कधी बंद तर कधी चालू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:42 IST

Soybean Market सोयाबीनच्या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन खरेदी करताना अनेक नियम लावल्याने या केंद्राकडे पाठ फिरवू लागले आहेत.

पुरुषोत्तम करवा

माजलगाव :सोयाबीनच्याSoybean शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन खरेदी करताना अनेक नियम लावल्याने शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यातच या खरेदी केंद्राकडे बारदाना उपलब्ध नसल्याने अनेक दिवस हे केंद्र बंदच पडलेले असते. त्यामुळे हे सोयाबीनचे खरेदी केंद्र नावालाच दिसत असून हे केंद्र कधी बंद तर कधी चालू असल्याचे दिसून येते.

माजलगाव तालुक्यात मागील वर्षी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

शासनाने सोयाबीनचा दर ४ हजार ८९२ रुपये जाहीर केलेला असताना येथील मोंढ्यात ४ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळू शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

सोयाबीनची खरेदी निम्मी झाली असताना या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. हे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले तेव्हापासून अनेक वेळा बारदान्याचे कारण पुढे करत अनेक दिवस बंद राहिले.

या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन खरेदी करताना अनेक नियम लावले असून हे सोयाबीन घेताना तीन चाळण्या देखील लावण्यात आलेल्या आहेत.

तीन ठिकाणी चाळण्यात आलेले सोयाबीन शेतकऱ्यांना परत देऊन केवळ नंबर एकचे सोयाबीन या ठिकाणी खरेदी करण्यात येत आहे. यामुळे चाळणी केलेले सोयाबीन कोणीच घ्यायला तयार नसते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकरी शासकीय सोयाबीन खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.

मोंढ्यात खरेदी झालेल्या सोयाबीनच्या तुलनेत शासकीय खरेदी केंद्रावर केवळ १५ टक्केच सोयाबीनची खरेदी झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रात अशाप्रकारे शेतकरी सोयाबीन घेऊन आल्यानंतर ते केंद्र बंद असते.

आर्द्रता १२ टक्केच

सोयाबीन खरेदी करत असताना खरेदी केंद्रावर त्याची आर्द्रता पाहण्यात येते. ज्या सोयाबीनची आर्द्रता १२ टक्के आहे. तेच सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांनी सोयाबीन खरेदी करताना १५ आर्द्रतेची अट घालण्यात आल्याचे सांगितल्यानंतर तसेच होताना दिसत नाही.

मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांचे आदेश असताना संबंधित विभागाकडून आर्द्रतेला १२ टक्क्यांचाच नियम लावण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे.

ग्रॅव्हिटी मशीनच नाही

* शासकीय खरेदी केंद्र देण्यात येत असताना संबंधित एजन्सीकडे ग्रॅव्हिटी मशीन असणे बंधनकारक असते. ही मशीन खरेदी केंद्रावर असल्यास शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीनमधील काडी कचरा व माती बाजूला करण्यात येते.

* मात्र ही मशीन महाग असल्याचे कारण पुढे करत संबंधित चालकाकडून ही मशीन घेतली नसल्याचे देखील बोलले जाते. यामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

आम्ही सध्या १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी करत आहोत. आम्हाला १५ टक्के आर्द्रतेचे पत्र मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही शासनाने ठरवून दिलेल्या नियमातच सोयाबीन घेत आहोत. - राजदीप दौंड, केंद्रप्रमुख वखार महामंडळ माजलगाव

हे ही वाचा सविस्तर:  Svamitva Scheme : आता प्रत्येक गावकऱ्याला मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'; योजनेचा उद्यापासून शुभारंभ

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेती