यंदाच्या हंगामातील सोयाबीनबाजारात दाखल होण्यास अद्याप दीड महिन्याच्या वेळ आहे. अशात बाजार समित्यांत जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे. बाजार समित्यांत सोयाबीनची आवक घटत असल्याने दरात वाढ होत असली तरी हमीभावापेक्षा कमीच दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनचे दर साडे चार हजार रुपये प्रती क्विंटलच्या जवळपास पोहोचले होते. मागील दीड महिन्यांपासून सोयाबीनचे ४ हजार २०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत स्थीर होते.
दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आशा सोडून या काळात सोयाबीनची विक्री केली. आता बाजार समित्यांत जुन्या सोयाबीनची आवक घटत असताना मागणीत वाढ होत आहे. असे असले तरी हमीभावाच्या तुलनेत सोयाबीनचे दर कमीच आहे.
नवे सोयाबीन बाजारात दाखल होण्यास अद्याप दीड महिना वेळ आहे. सोयाबीनच्या दरात दोन दिवसांपासून सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर सकारात्मक परिणाम होत असतानाच हमीभावापेक्षा अधिक दर मिळतील, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांना आहे.
खाद्यतेलाच्या मागणीत वाढीचा परिणाम
आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य तेलाच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या तेलाचे दरही मागील आठ दिवसांपासून काहीसे वाढत आहेत. याचा परिणाम बाजारावर होत असून, मागणीच्या तुलनेत सोयाबीनचा पुरवठा कमी असल्याने सोयाबीनच्या दरात आता वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापुढेही सोयाबीनच्या दरात सुधारा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
चारच दिवसांत २०० रुपयांपेक्षा अधिक वाढ
जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोमवारपर्यंत सोयाबीनला सरासरी कमाल ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपेक्षाही कमी दर मिळत होते. मंगळवारपासून मात्र सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आणि गुरुवारी सोयाबीनच्या दराने ४ हाजर ४०० रुपये प्रती क्विंटलचा टप्पाही ओलांडला. अर्थात जिल्ह्यातील बाजार समित्यांत चार दिवसांतच सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे.
सोयाबीनला कोठे किती कमाल दर?
वाशिम | ४४१५ |
कारंजा | ४४०० |
मंगरुळपीर | ४४५५ |
मानोरा | ४४०० |