यवतमाळ : दिवाळी आणि शासकीय सुट्यांमुळे शासकीय आणि खासगी बाजार समितीमधील धान्य उलाढाल थांबली आहे. २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत बाजार समित्या बंद राहणार आहे.
मंगळवारी ५ नोव्हेंबरपासून बाजार समितीमधील शेतमालाच्या धान्याची उलाढाल होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी बाजार समित्यांमध्ये दिवाळीमुळे शेतमालाची मोठी आवक होती.
२८ ऑक्टोबरला बाजार समिती हाऊसफुल्ल असल्याने रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी शेतमालाचे काटे सुरू होते. बाजार समिती उघडल्यानंतर शेतमालाचे दर कसे राहतात यावरही बाजारपेठेतील गर्दी विसंबून राहणार आहे.
दिवाळी असल्यामुळे आणि रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये गर्दी केली होती. बाजारपेठेत अचानक गर्दी वाढल्याने सोयाबीनच्या दरातही घसरण नोंदविण्यात आली होती.
याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. नाफेडच्या सोयाबीन संकलन केंद्रात सोयाबीनला ४ हजार ९९२ रुपये क्विंटलचे दर जाहीर झाले. मात्र खुल्या बाजारात ३ हजार ५०० रुपये क्विंटलचे दर असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र शेतमाल न विकल्यास रब्बीची पेरणीच करता येत नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे. सोयाबीन प्लांटच्या दरावरच सोयाबीन खरेदीचे दर विसंबून आहे. बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा प्लांटचे दर सुधारले तर शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. अन्यथा कमी दरातच सोयाबीन विकावे लागेल.
शेतकऱ्यांचा सावध पवित्रा
मंगळवारी बाजारपेठेत सोयाबीनला काय दर राहतात याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. यामुळे मंगळवारी (५ नोव्हेंबर) सोयाबीनचे दर घसरले तर आवक घटण्याची शक्यता आहे. एनसीडीएक्सच्या दरावर सोयाबीनच्या दराची बोली असल्याने शेतकऱ्यांना या दरात सुधारणा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.