Join us

Soybean Market : आवक कमी त्यात दराचीही नाही हमी; सोयाबीन उत्पादकांचे यंदा हाल बेहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 9:04 AM

यंदाच्या हंगामात अगदी प्रारंभापासूनच सोयाबीन उत्पादकांना (Soybean Producer) निसर्गाच्या असमतोलपणाचा फटका बसला. उत्पादनातही (Production) कमालीची घट मिळाली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उमरेडच्या बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) आवकही फारच कमी दिसून आली. शिवाय सोयाबीनला दराचीही (Soybean Market Rate) हमी नसल्याने कष्टकऱ्यांचे हाल-बेहाल होत आहेत.

उमरेड : यंदाच्या हंगामात अगदी प्रारंभापासूनच सोयाबीन उत्पादकांना निसर्गाच्या असमतोलपणाचा फटका बसला. उत्पादनातही कमालीची घट मिळाली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपूर मधील उमरेडच्या बाजार समितीमध्ये आवकही फारच कमी दिसून आली. शिवाय सोयाबीनला दराचीही हमी नसल्याने कष्टकऱ्यांचे हाल-बेहाल होत आहेत. यावर्षी उमरेड बाजार समितीमध्ये ३ ऑक्टोबरपासून सोयाबीनची आवक सुरू झाली.

आतापर्यंत २७ हजार ७०० पोत्यांच्या आसपास सोयाबीनची आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत आवक फारच कमी असून, चिंताजनक परिस्थिती दिसून येत आहे. मागीलवर्षी संपूर्ण वर्षभरात २ लाख १७ हजार ८१४ पोत्यांची आवक उमरेड बाजार समितीमध्ये झाली होती. मागीलवर्षी आतापर्यंत ३१ हजार पोत्यांच्या आसपास आवक झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये रेकॉर्डब्रेक ८० हजार पोत्यांची नोंद झाली. यंदा ही आकडेवारी मोडीत निघेल, असे वाटत नाही.

यावर्षी मालाचा दर्जा खूप खराब असून, कापणी दरम्यानसुद्धा पावसाने खोळंबा आणला. अगदी पेरणीपूर्व ते मळणीपर्यंत निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला अनेकांनी हार्वेस्टरचा उपयोग केला. यामुळेही सोयाबीनच्या दाण्याला मार बसला. सोयाबीनचे एकरी उत्पादनही कमालीचे घटले. एकरी दोन-चार पोत्यांच्या पलीकडे उत्पादन झाले नाही.

शिवाय दाणाही अगदी बारीक असल्याने सोयाबीन उत्पादकांना दरसुद्धा परवडण्यासारखे राहिले नाही. यामुळे कष्टकरी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आधारभूत नोंदणी केंद्रसुद्धा सुरू झाले असून, या सेंटरचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही केले जात आहे.

३,२०० ते ४,५०० प्रतिक्विंटल

सोयाबीन उत्पादकांना आतापर्यंत सरासरी ३,२०० ते ४,५०० रुपये असा दर मिळाला आहे. त्यातही सोयाबीन खराब असल्याने फारच कमी शेतकऱ्यांना ४,००० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल हा दर मिळाला. मागील वर्षीही ४,५०० ते ५,००० असे सोयाबीनचे दर अतिशय कमी होते. अल्प दरामुळे आणि उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, नवीन शासनाने नवीन धोरण आखत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

निसर्गाच्या असमतोलपणामुळे सोयाबीन आणि कापूस दोन्ही पिकांचे नुकसान झाले. उत्पादनात कमालीची घट आली. यामुळे यावर्षी बाजार समितीमध्ये आवक फारच कमी झाली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना सुरू असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. - रूपचंद कडू, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड.

हेही वाचा :  Farmer Success Story : शेतकऱ्याने झेंडू शेतीतून साधले अर्थकारण; तीन महिन्यांत मिळाले तीन लाखांचे उत्पन्न

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेती क्षेत्रशेतीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड