Soybean Market :
वाशिम : दिवाळी नंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असली तरी, शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. आता आठवडाभरातच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली त्यात एकट्या कारंजा बाजार समितीत मागील गुरुवारपासून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले.
रब्बी हंगामाच्या तयारी कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकरी खरीप हंगामात उत्पादित शेतमालाची विक्री करीत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक अधिक वाढली आहे.
जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या प्रमुख बाजार समित्यांसह अनसिंग, शेलुबाजार आणि शिरपूर या उपबाजारांमध्येही सोयाबीनची प्रचंड आवक होत आहे. त्यामुळे मागील आठवडाभरातच जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आणि उपबाजार समित्या मिळून जवळपास एक लाख २५ हजारांपेक्षा अधिक क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
यामध्ये एकट्या कारंजा बाजार समितीतच मागील गुरुवारपासून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढत असली तरी सोयाबीनच्या भावात मात्र कसलीही वाढ होत असल्याचे दिसत नाही.
त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड निराशेचे वातावरण पसरले आहे; परंतु रब्बी हंगामातील विविध कामांसह कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सोयाबीनच्या
विक्रीवर भर देत असल्याचे यासंदर्भात शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेतून कळले आहे. त्यामुळे पुढे आणखी महिनाभर सोयाबीनची आवक बाजार समितीत वाढतच राहणार असल्याचे दिसत आहे.
आवक वाढल्याने मोजणीला होतोय विलंब
बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. कारंजा आणि वाशिम बाजार समितीत प्रामुख्याने सोयाबीनची सर्वाधिक आवक होत आहे. त्यात कारंजा बाजार समितीत दर दिवसाला सरासरी दहा हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत असल्याने शेतमाल मोजणीला विलंब होत असून, नियोजनासाठी बाजार समितीला सोयाबीनची आवकही अधूनमधून थांबवावी लागत आहे.
वाशिममध्ये गुरुवारी साडेदहा हजार क्विंटल आवक
जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. कारंजा बाजार समितीत आठवडाभरात ४० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर वाशिम बाजार समितीतही आठवडाभरात ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. याबाजार समितीत गुरुवारी १४ नोव्हेंबरलाही १० हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे बाजार समितीच्या लिलावातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
असे होते सोयाबीनचे दर
७ नोव्हेंबर | १०,५०० |
८ नोव्हेंबर | ११,००० |
९ नोव्हेंबर | ०० |
११ नोव्हेंबर | १२,००० |
१२ नोव्हेंबर | ०० |
१३ नोव्हेंबर | ८००० |