विनायक चाकुरे
साधारणपणे पावसाळ्यामध्ये शेतमालाचा हंगाम संपलेला असतो. त्यामुळे मार्केट यार्डात शेतमालाची आवक जेमतेम असते. परंतु यावर्षी जून महिना सुरू झाल्यापासून पंधरा दिवस मार्केट यार्ड चालू होते. दरम्यान, शेतकऱ्यांकडील तब्बल ८० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री झाल्याची माहिती उदगीर येथील बाजार समिती प्रशासनाने दिली.
जून महिना सुरू झाला की या भागातील शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. यावर्षी उन्हाळा कडक होता. त्यामुळे पावसाळासुद्धा चांगला राहील असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला. जून महिन्याच्या एक तारखेपासून बाजारात शेतकऱ्यांकडील सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गेल्यावर्षी सोयाबीनला भाव वर्षभर समाधानकारक मिळालाच नाही.
दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासूनचे सोयाबीन विक्रीविना ठेवले होते. तर काही शेतकऱ्यांनी किमान हंगाम संपल्यानंतर तरी सोयाबीनला भाव येईल यामुळे शेतमाल घरीच ठेवला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात काही भागात पाऊस झाला. गेल्यावर्षी या भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने धोका दिल्यामुळे खरीप हंगामाचे शेवटचे पीक असलेले तुरीचे उत्पादन हाती आले नाही.
तसेच रब्बीचा हंगामसुद्धा जमिनीत ओल नसल्यामुळे कोरडाच गेला. त्यामुळे शेतकऱ्याकडे केवळ सोयाबीनशिवाय दुसरे कुठलेही पीक विक्री करून खरिपाच्या खर्चाची तडजोड करण्यासाठी हाती नव्हते.
मागील वर्षी शासनाने सोयाबीनला ४ हजार ६०० एवढा दर घोषित केला होता. परंतु मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनचा दर ४ हजार ४०० च्या आसपास दराने बाजारात विक्री होत आहे. मागील वर्षभर सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क माफ करून एक प्रकारे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कितीही धीर धरून बाजारात सोयाबीन विक्रीविना घरीच ठेवला तरी त्याचा बाजारावर फारसा परिणाम झालेला नाही.
परंतु शेतकऱ्याचे मात्र फार मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी हंगामाच्या दरम्यान ४ हजार ९०० ते ५ हजार रुपये भाव असताना सोयाबीनची विक्री केली त्या शेतकऱ्यांचा विचार केला असता मागील १५ दिवसांत विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका बसला आहे. यंदा पावसाने मृग नक्षात्रतच हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होत असून, यंदा हमीभाव वाढीव असल्याने चांगला दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
हमीभावात २९२ रुपयांची वाढ...
• चालू हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनच्या दरात २९२ रुपयांची वाढ केलेली आहे. केंद्र सरकारला चालू हंगामात वाढीव हमीभावाला संरक्षण द्यायचे असेल तर त्याला पूरक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर पुढील काळात नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर सरकारला हमीभावाने खरेदी करण्याची वेळ येऊ शकते.
• तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या ही बाब सरकारला न परवडणारी असल्यामुळे कदाचित येणाऱ्या काळात खाद्यतेलावरील शुल्क वाढ निर्णय सरकार घेऊ शकते.
हमीभावापेक्षा कमी दराने विक्री...
• मागील पंधरा दिवसांत बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीन विक्री करण्याशिवाय पर्याय नव्हता.
• भाव वाढतील या अपेक्षेने विक्रीविना घरी ठेवलेल्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. सोयाबीन हमीभावापेक्षा २०० प्रतिक्विंटल दराने विक्री करण्याची वेळ आली असल्याचे उदगीर बाजार समितीमधील आडत व्यापारी दिलीप बिरादार यांनी सांगितले.
हेही वाचा - ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान