आज भाव मिळेल, उद्या भाव मिळेल, या आशेने अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलेले आहे. आता त्याची बाजारात आवक होत असून, मंगळवारी लातूरच्या मार्केट यार्डात १५ हजार २२५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले होते. दर मात्र म्हणावा तितका मिळाला नाही. सर्वसाधारण दर ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल होता. दरम्यान, सोयाबीनला दर मिळेल या आशा मावळल्या आहेत.
लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र आहे. हजारो एकरमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी पाऊसपाणी चांगले नसतानाही उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. यंदा तर पेरणीच्या प्रारंभापासून पाऊस होत आहे. त्यामुळे पिके चांगली वापली आहेत. सोयाबीन बहरले आहे. पाच लाख हेक्टर्सच्या आसपास सोयाबीनची पेरणी यंदा झालेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना या नवीन हंगामात तरी भाव मिळेल की नाही, अशी भीती आहे. मंगळवारी लातूर येथे सोयाबीनला कमाल ४ हजार ३४७ रुपये, किमान ४ हजार २५० आणि सर्वसाधारण ४३०० रुपये दर होता.
बाजारात शेतमालाची आवक (क्विंटल)
गहू | १७५ |
ज्वारी हायब्रीड | १३ |
ज्वारी रब्बी | ५१८ |
ज्वारी पिवळी | ८० |
हरभरा | १९११ |
तूर | ५०१ |
एरंडी | ५ |
करडई | ६८ |
मोहरी | ६ |
सोयाबीन | १५२२५ |
बाजारात आवक
• पिकांच्या आंतरगत मशागतीला पैसे मिळावेत म्हणून बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे. मात्र सोयाबीनला दर चांगला मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
उडीद, मुगाचाही पेरा बऱ्यापैकी
• सोयाबीनचा नवीन हंगाम तोंडावर असताना जुन्या हंगामातील सोयाबीनला अद्याप दर मिळाला नाही. मागच्या वर्षी ११ हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा दर गेला होता. या हंगामात ५ हजारांच्या पुढे दर गेलेला नाही.
• तरीही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झालेला आहे. वेळेत आणि चांगला पाऊस झाल्यामुळे उडीद, मुगाचाही पेरा झाला. परंतु, सोयाबीनला पर्याय म्हणून जेवढा उडीद, मुगाचा पेरा अपेक्षित होता, तेवढा पेरा झाला नसल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नवीन हंगामातही सोयाबीनला चांगला दर मिळण्याची वाट पहावी लागेल, असे सध्या तरी दिसते.