Soybean Market :
नंदलाल पवार :
मंगरुळपीर : केंद्र शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, 'मिल क्वॉलिटी' सोयाबीनच काय, तर बिजवाई (सीड क्वॉलिटी) सोयाबीनचीही हमीपेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. सोयाबीनचे हमीभाव प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये असताना मंगळवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला केवळ ४ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचेच दर मिळाले.
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी आता निम्म्यावर आली असून, शेतकरी सणावाराच्या तोंडावर सोयाबीनची विक्री करीत आहेत. अशातच काही बियाणे कंपन्यांनी पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. बाजार समित्यांत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची खरेदी काही व्यापारी करू लागले आहेत.
दरम्यान, शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्याने सोयबीनचे दर वाढण्याची अपेक्षा आणि शक्यताही वाढली होती. प्रत्यक्षात चित्र उलटेच आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच होताना दिसत आहे.
त्यात 'मिल क्वॉलिटी' सोयाबीनला हमीपेक्षा खूप कमी दर मिळत असतानाच आता बिजवाई दर्जाच्या सोयाबीनलाही हमीपेक्षा कमी दर मिळत आहेत.मंगळवारी वाशिम बाजार समितीत अवघ्या ४ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटल दराने बिजवाई सोयाबीनची खरेदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दर नाही; पण आवक वाढली
यंदाच्या हंगामातील सोयाबीनची काढणी वेगात सुरू असून, शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर भर देत आहेत. बाजार समित्यात या शेतमालाच्या दरात वाढ दिसून येत नसली तरी दिवाळीच्या तोंडावर बाजार समित्यांत सोयाबीनची आवक मात्र वाढत आहे. मंगळवारी कारंजा बाजार समितीत ६ हजार क्विंटल, तर वाशिम बाजार समितीत ४ हजार ८७० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
सोयापेंडच्या दरातील घसरणीचा परिणाम
मागील काही दिवसांपासून सोयापेंडच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसत असून, देशांतर्गत बाजारपेठेतही सोयाबीनचे दर दबावातच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर घोर निराशा होत आहे.
मिल क्वॉलिटी' सोयाबीनला किती दर?
बाजारपेठ | दर |
वाशिम | ३८३५-४५०१ |
कारंजा | ३८७५-४५०० |
मानोरा | ३८५०-४६०० |
मंगरुळपीर | ३५००-४५६० |
रिसोड | ४३३० - ४५६० |