Join us

Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 6:44 PM

औसा अडत बाजारपेठेत नवीन सोयाबीनची आवक आता सुरु झाली आहे. नवीन साेयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market)

Soybean Market :

महेबूब बक्षी / औसा:

यंदा वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांनी शिवार बहरला आहे, तर दुसरीकडे लवकर पेरणी झालेले सोयाबीन अनंत चतुर्थीच्या अगोदरच अडत बाजारपेठेत आले आहे.

दरम्यान, खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाल्याने दरातही ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली. परिणामी, शेतकऱ्यांनी घरातील जुने सोयाबीनहीबाजारात आणले असून, पुन्हा दरात घसरण होईल, या धास्तीने त्याची विक्री सुरू केली आहे.

औशातील अडत बाजारपेठेत रविवारी (१५ सप्टेंबर) रोजी ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यात १०० क्विंटल नवीन सोयाबीन आले आहे.परजिल्ह्यासह कर्नाटकाच्या सीमा भागातील शेतकरी शेतमाल घेऊन येत आहेत.

पावसाने साथ दिल्यास पुढील आठवड्यात नवीन सोयाबीनची आवक अधिक प्रमाणात वाढेल, असे  बाजार पेठेचे सचिव संतोष हुच्चे यांनी सांगितले. येथील अडत बाजारपेठेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होते.

मागील वर्षी ४ लाख १३ हजार १७५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. बारा महिने थोड्याफार प्रमाणात आवक सुरू असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आवक होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आतापासूनच अडत बाजारपेठेत गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सोयाबीनला कमाल ४ हजार ७६५, किमान ४ हजार ३००, तर साधारण ४ हजार ६४४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

काही प्रमाणात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वास्तविक, सोयाबीन पेरणीपासून ते बाजारात आणेपर्यंत लागणारा खर्च पाहता मिळणारा दर फार कमी आहे. दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

९३ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा

औसा तालुक्यातील एकूण खरिपाच्या पेरणी क्षेत्रापैकी ९३ टक्के म्हणजेच ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. वेळोवेळी पाऊस झाल्याने पीकही जोमात आले असून, उत्पन्नवाढीची आशा आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने साथ द्यावी, अशी प्रार्थना शेतकऱ्यांतून होत आहे.

काढणीसाठी पिशवीला पाच हजारांचा दर

सोयाबीनच्या नवीन हंगामाचा श्रीगणेशा होताच मजुरांचा भावही वाढला. गेल्या वर्षी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये असलेला दर आता ५ हजारांच्या पुढे गेला. जर पावसाने उघडीप दिली तर मजुरीचा दर असाच राहील. थोडाफार पाऊस झाल्यास दर ६ हजारांपर्यंतही जाऊ शकतो. मजूर एकत्र येऊन शेतकऱ्यांशी काढणीचा ठराव महिन्यांपूर्वीच केला आहे. सध्या रानोमाळ सोयाबीन बघत मजूर फिरताना दिसत आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनलातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेती