Soybean Market :
वाशिमः यंदाच्या हंगामातील सोयाबीनची काढणी वेगात सुरू आहे. अशात मागील वर्षीच्या हंगामातील साठवलेल्या सोयाबीनसह यंदाच्या हंगामातील सोयाबीनची विक्री शेतकरी करू लागले आहेत. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांत जवळपास १५ हजार क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक झाली होती. त्यात एकट्या कारंजा बाजार समितीतच नऊ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती.
केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात २० टक्के वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा असताना तसे झाले नाही.
केंद्राच्या निर्णयाला महिना उलटल्यानंतरही बाजार समित्यांत शुक्रवारी सोयाबीनला सरासरी ४ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचेच दर मिळत आहेत. दिवाळीचा सण तोंडावर असल्याने दर कमी असले तरी मागीलवर्षी साठवलेल्या सोयाबीनसह यंदाच्या हंगामातील सोयाबीन विकण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याने बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत आहे.
कारंजा बाजार समितीत शुक्रवारी ९ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. रिसोड बाजार समितीतही या दिवशी २००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. बाजारात आवक वाढत असली तरी सोयाबीनच्या दरावर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बाजारात आवक वाढणार!
विजयादशमीचा सण आटोपल्यानंतर दिवाळी या सणाची तयारी जोरात सुरू आहे. या सणापूर्वी देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासह खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग राहणार आहे. त्यातच दिवाळीत आठवडाभर बाजार समित्यांचे व्यवहार बंद असतात. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोयाबीनची आवक अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ७० टक्के काढणी पूर्ण !
बाजारात जुन्या सोयाबीनसह नवे सोयाबीनहीं बाजारात विक्रीला दाखल होत आहे. तथापि, नव्या सोयाबीनचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात जवळपास ७० टक्के क्षेत्रातील सोयाबीनची काढणी आटोपली आहे. तथापि, नव्या सोयाबीन ऐवजी गेल्या हंगामातील साठवलेले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. त्यामुळेही बाजारातील आवक वाढत आहे.
कोठे किती कमाल दर किती आवक
बाजार समिती | आवक | भाव |
कारंजा | ९०० | ४५७५ |
मंगरुळपीर | २५०० | ४६५० |
रिसोड | २०४० | ४४६५ |
मानोरा | ४५० | ४६५० |