Soybean Market :
वाशिम:
केंद्र सरकारने शनिवारी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. शासनाने कच्चे सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ,
तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे. त्यानंतर एकाच रात्रीतून खाद्यतेलाचे दर प्रतिकिलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढले.
तथापि, सोयाबीनच्या दरात मात्र म्हणावी तशी वाढ अद्यापही दिसली नाही. मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित असे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यात निराशेचे वातावरण आहे. त्यातच मागीलवर्षी दरात कमालीची घसरण झाली.
या पार्श्वभूमीवर सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात २० ते ३० टक्के वाढ करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर केंद्राने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली.
यानंतर एकाच रात्रीत सोयाबीनचे तेल ११० रुपयांहून १३० रुपये, शेंगदाणा तेल १७५ वरून १८५ रुपये, तर सूर्यफूल तेल ११५ वरून १३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले.
तसेच, आठवडा उलटला, तरी सोयाबीन दरात मात्र म्हणावी तशी वाढ अद्यापही दिसली नाही.
उच्च दरातील खरेदी मोजकीच
• बाजार समित्यात सद्यस्थितीत सोयाबीनला कमाल ४ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळत असल्याचे दिसत आहे.
• या उच्च दरातील खरेदीचे प्रमाण अगदीच नगण्य असून, सोयाबीनची अधिकाधिक खरेदी ही ४ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा कमीच दराने होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
हमीभावाचा टप्पा लांबच !
सोयाबीनच्या दरात वाढ करण्यासाठी शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढविले. या निर्णयामुळे शासनाने जाहीर केलेल्या ४ हजार ८९२ रुपये प्रती क्विंटलच्या हमीभावापेक्षा बाजार समित्यांत सोयाबीनला त्यापेक्षा अधिक किंवा तेवढे तरी भाव मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र हमीभावाचा हा टप्पा अद्यापही सोयाबीन उत्पादकांसाठी लांबच असल्याचे दिसते.
बाजारातील आठवडाभरापूर्वी चे आणि आताचे सोयाबीन दर
बाजारपेठ | आठवडाभरापूर्वीचे दर | आताचे दर |
कारंजा | ४७३५ | ४६९० |
वाशिम | ४६०१ | ४६२० |
रिसोड | ४५०५ | ४६१० |
मानोरा | ४५५० | ४६७५ |
मंगरुळपीर | ४६७५ | ४७७० |