Join us

Soybean Market Rate : हमीदराने खरेदी बंद झाल्याचा परिणाम; सोयाबीनचे दर गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:53 IST

हमीदराने सोयाबीनची खरेदी बंद झाल्याचा परिणाम बाजार समित्यांमध्ये दिसू लागला आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर कमी झाले असून, सरासरी ३,६०० ते ३,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

हमीदराने सोयाबीनची खरेदी बंद झाल्याचा परिणाम बाजार समित्यांमध्ये दिसू लागला आहे. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर कमी झाले असून, सरासरी ३,६०० ते ३,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

त्यामुळे शेतमालाची साठवणूक करून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात नाफेड खरेदी केंद्रामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची मुदतवाढ ६ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली.

त्यानंतरही बुलढाणा जिल्ह्यातील १४,०६१ शेतकऱ्यांची या केंद्रांमध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रलंबित राहिली. मुदतीच्या शेवटच्या दिवशी नाफेड खरेदी केंद्रांसमोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

लाइटची व्यवस्था असलेल्या केंद्रांत गुरुवारी रात्री ९:०० वाजतापर्यंत खरेदी चालली. मात्र, बहुतांश केंद्रांवर सायंकाळी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी न करता परत पाठवण्यात आले.

खरेदी बंदचा परिणाम आता बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरावर दिसून राहिला आहे. या विषयाचा फायदा काही व्यापारी घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

१४ हजार ६१ शेतकऱ्यांची हमीभावाने खरेदी प्रलंबित  

सुरुवातीला सोयाबीनमध्ये अधिक आर्द्रतेचे कारण समोर करून खरेदीस विलंब झाला. मध्यंतरी बारदाणा उपलब्ध नव्हता आता खरेदी बंद झाली.

हेही वाचा : कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डविदर्भ