Soybean Market Rate :
विवेक चांदूरकर
खामगाव :
सरकारने आयात शुल्क वाढविल्यामुळे सोयाबीनच्या भावात २५० ते ३०० रुपयांनी प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन १५ दिवसांनी बाजारात येण्याला सुरुवात होणार आहे. भाववाढीने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
खामगाव जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक आहे. यावर्षी सरासरीच्या १११ टक्के क्षेत्रावर ४ लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळाच्या ५० टक्के क्षेत्रफळावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मागील वर्षी सोयाबीनचे दर ४ हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते.
यावर्षी जास्त पावसामुळे अनेक भागातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत सोयाबीनचे दर कमी होते. मात्र, आता सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
यावर्षीचे सोयाबीन १५ दिवसांनी बाजारात येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आणखी भाववाढ होणार, की शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच भाव पडतील, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
सरकारने सोयाबीनला ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यायला हवा. कृषीमूल्य आयोग हमीभाव जाहीर करताना विद्यापीठाकडून अहवाल घेते. मात्र कृषी मूल्य आयोगाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे मत घेऊन हमीभाव ठरवायला हवा. शेतकऱ्यांना किती उत्पादन होते, याची प्रत्यक्ष पाहणी करायला हवी. - प्रशांत डिक्कर, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
जगात एकरी ४७ क्विंटल सोयाबीन पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वापरण्याची मुभा आहे. ते तंत्रज्ञान आपल्याकडील शेतकऱ्यांना वापरू द्यावे व जगाची बाजारपेठ खुली करावी. आपल्याकडे मुबलक पाणी, मुबलक सूर्यप्रकाश, काळी कसदार जमीन ही जगाच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे भारतीय शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. - देवीदास कणखर, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
मागील वर्षीचे सोयाबीन घरातच पडून
मागील वर्षी सोयाबीनचा भाव कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्री केली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरात मागील वर्षीचे सोयाबीन घरातच पडून आहे. यावर्षी पुन्हा सोयाबीन येणार आहे. यावर्षी भाव वाढला नाही तर शेतकऱ्यांना दोन्ही वर्षाचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
दहा दिवसांत वाढला भाव
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ सप्टेंबर रोजी सोयाबीनचा दर ३ हजार ३७५ ते ४ हजार ४०० रुपये होता, तर १४ सप्टेंबर रोजी यामध्ये वाढ होऊन ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये भाव मिळाला. दहा दिवसांत २०० रुपयांनी भाववाढ झाली आहे.
१११ टक्के पेरणी
सोयाबीनची यावर्षी कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा १११ टक्के पेरणी केली आहे. ४ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सोयाबीनवर अवलंबून आहे.
असे होते सोयाबीनचे दर
५ सप्टेंबर | ३३७५ ते ४४०० |
१४ सप्टेंबर | ४००० ते ४६०० |