Soybean Market :
लातूर : दीपावली पाडव्यानंतर सोमवारी बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक ४९ हजार ०११ क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे बाजार फुलून गेला होता.
वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. सर्वसाधारण दरात किंचित वाढ होऊन ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. परंतु, हमीभावाच्या तुलनेत जवळपास ४९२ रुपये कमी होता.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा जिल्ह्यात सर्वाधिक पेरा झाला होता. पीक काढणी व राशीच्या वेळी परतीचा पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले. आर्थिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांनी कुटुंबात सण साजरा करण्यासाठी मिळेल त्या दराने विक्री करण्यास सुरुवात केली होती.
बाजारपेठेत मागणी कमी अन् ओलावा अधिक असल्यामुळे दरात घसरण झाली होती. शासनाने ४ हजार ९८२ रुपये प्रति क्विंटल अशी किमान आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयांपेक्षा अधिक फटका सहन करावा लागत होता.
सोयाबीनला दर मिळेना
• हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. मात्र रब्बी पेरणी आणि सणासुदीमुळे नाविलाजाने सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे आवक वाढली आहे.
वाहनांच्या रांगाच रांगा...
* लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी रात्रीपासून सोयाबीनची आवक होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे लातूर परिसराबरोबर जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील सोयाबीन घेऊन आलेली वाहने मोठ्या प्रमाणात होती.
* परिणामी, बाजार समितीच्या परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. वेळेत शेतमाल उतरवून घेण्यासाठी आडत्यांची कसरत होत होती.
४९ हजार ०११ क्विंंटल आवक....
दीपावली पाडव्या दिवशी बाजार समितीत ३५ हजार ८७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सोमवारी ४९ हजार ११ क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे मार्केट यार्डात दिवसभर चाळणी, मापतोल सुरू होते. कमाल भाव ४ हजार ५६५ रुपये, किमान दर ३ हजार ९०० रुपये तर सर्वसाधारण भाव ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.
४० कोटींची उलाढाल...
दरवर्षी दीपावली पाडव्यास मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होते. यंदाही जवळपास ३६ हजार क्विंटल आवक झाली होती.सोमवारी तर उच्चांकी ४९ हजार ११ क्विंटल सोयाबीन आवक झाली. कमाल दरात वाढ झाली नसली तरी सर्वसाधारण दरात वाढ होऊन ४ हजार ४०० रुपये असा भाव मिळाला आहे. दिवसभरात जवळपास ४० ते ४५ कोटींची उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
बाजार समितीतील आवक अन् साधारण दर...
तारीख | आवक | दर |
४ नोव्हेंबर | ४९०११ | ४४०० |
२ नोव्हेंबर | ३५,८७२ | ४,४०० |
२६ ऑक्टोबर | २५,९३२ | ४,३७० |
२५ ऑक्टोबर | २२,८६७ | ४,३८० |
२४ ऑक्टोबर | २०,६१५ | ४,३५० |
२३ ऑक्टोबर | २६,६३५ | ४,३०० |
२२ ऑक्टोबर | २७,४४४ | ४,२८० |
२१ ऑक्टोबर | २३,०३५ | ४,२९० |