राज्यात सोयाबीनची आवक मंदावली असून मागील चार दिवसांपासून बाजारपेठेत विक्रीत चढउतार दिसून येत आहे. होळी, धुळवडीनंतर ही आवक काही प्रमाणात वाढली होती. शनिवार, रविवारी पुन्हा सोयाबीनची आवक घटल्याचे दिसून आले.
आज सकाळच्या सत्रात राज्यात २४४ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी धाराशिवमध्ये ७५ क्विंटल सोयाबीनला ४५०० रुपयांचा भाव मिळत असून हिंगोलीच्या पिवळ्या सोयाबीनला ४२७५ रुपयांचा भाव मिळत आहे.
नागपूर बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ११४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना कमीत कमी ४१०० तर जास्तीत जास्त ४३११ रुपयांचा दर मिळाला. बुलढाण्यात आज केवळ एक क्विंटल सोयाबीन आले. यावेळी सर्वसाधारण ४१०० रुपयांचा दर मिळाला.
यंदा सोयाबीनच्या दरानेही शेतकऱ्यांची निराशा केली असून आता कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर आलेल्या उत्पादनालाही चांगला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तर सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली असून दरही कमीच मिळत असल्याचे चिन्ह आहे.