जवळा पांचाळ (हिंगोली) : गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सोयाबीनचे दर वाढेल, या आशेवर शेतकरी मागील एक वर्षापासून सोयाबीनचे पीक घरात ठेवले आहे.
बाजारपेठेत सोयाबीन कमी प्रमाणात विक्रीस येत असल्याने व्यापारीही त्रस्त झाले आहे. सोयाबीन बियाणाचे दर गतवर्षीपासून वाढत आहे. मात्र, सोयाबीनच्या किमती घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन चार हजार रुपये तर
बियाणे बारा हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. सोयाबीन बियाणाची २५ किलोची एक पिशवी घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सोयाबीनला भाव कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मागील वर्षी सोयाबीन येलो मोझक या रोगाच्या कचाट्यात सापडला होता. यामुळे या पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यासाठी या पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नाही. सोयाबीनचे दर पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी दरवाढ होईल, या आशेने सोयाबीन घरीच ठेवले होते; पण बघता-बघता वर्ष निघाले.
परंतु सोयाबीनच्या दरात काही वाढ झाली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी पैशांची अडचण भासत असल्याने सोयाबीन कमी भावात विक्री केले आहे. ऐन पेरणीच्या काळात सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.