Soybean Market :
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन सोंगणी व काढणीची लगबग सुरू आहे. आगामी सण, उत्सवाचे दिवस असल्याने शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. नवे सोयाबीनच नव्हे, तर जुन्या सोयाबीनलाही बाजार समित्यांत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
भारत सरकारने क्रूड आणि रिफाइंड सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क वाढवून अनुक्रमे २० टक्के आणि ३२.५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु तसे कोणतेच चित्र अद्यापही बाजार समित्यांत दिसत नाही.
तेलाच्या आयात शुल्कातील वाढीनंतर तेलाचे दर वाढत असले तरी सोयाबीनचे भाव मात्र कमी कमीच होत आहेत. बाजार समित्यांत नव्या सोयाबीनची खरेदी किमान ३ हजार ४०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल, तर जुन्या सोयाबीनची खरेदी ३ हजार ८०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भावानेच होत आहे.
सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सध्या सोंगणी व काढणीची लगबग सुरू आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला असून, उत्पादनात घट झाली आहे.
सोयाबीनचे महिनाभरापूर्वीचे आणि आताचे भाव
बाजार | आताच भाव | सप्टेंबरमधील भाव |
वाशिम | ४५०० | ४६२० |
कारंजा | ४५६० | ४४४० |
मंगरुळपीर | ४६५० | ४६०० |
मानोरा | ४६०० | ४४५० |
रिसोड | ४६१० | ४४२५ |
तेलाचे महिनाभरापुर्वीचे दर आणि आताचे दर
महिनाभरापुर्वीचे दर | आताचे दर | |
सोयाबीन | ११० | १३५ |
शेंगदाना | १७० | १९० |
सूर्यफुल | ११५ | १३० |
मोहरी | १४० | १६० |
भाववाढ शक्यता कमी! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनची आवक काही दिवसांत वाढणार आहे. बाजार समित्यांत सध्याच सोयाबीनला कमाल ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच भाव मिळत आहे. त्यात आवक वाढल्यानंतर सोयाबीनच्या भावात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.