सरत्या हंगामात सोयाबीनला अत्यल्प दर मिळाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र घटण्याची शक्यता वाटत होती. परंतू, बाजारातील अल्पदरानंतरही राज्यात यंदा तब्बल ९ लाख ९ हजार ५९३ हेक्टरने सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
कृषी विभागाच्या २१ ऑगस्टच्या पेरणी अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. राज्यात खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचीच पेरणी होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी तब्बल ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही अधिक दराने सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला.
तथापि, मागील दोन हंगामांत सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच आली. सरत्या हंगामात शासनाने सोयाबीनला ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता. दिवाळीच्या काळात या शेतमालास हमीभावापेक्षा थोडे अधिक दर मिळाले. त्यानंतर मात्र दरात घसरण होत गेली.
सद्यःस्थितीत सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचेच दर मिळत आहेत. शिवाय, यंदा नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक तोट्याचेच ठरले. त्यामुळे यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटण्याची शक्यता वाटत होती. प्रत्यक्षात राज्यात सोयाबीनचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ९ हजार ५९३ हेक्टरने वाढले आहे.
विभागात किती हेक्टरवर सोयाबीन?
विभाग | लागवड क्षेत्र |
कोकण | ०० |
कोल्हापूर | १,७२,४९८ |
नाशिक | १,८५,८६३ |
नागपूर | २,८३,४७७ |
पुणे | ३,७१,६८३ |
छ. संभाजीनगर | ५,९५,२४२ |
अमरावती | १५.११,४३४ |
लातूर | १९,३९,३०९ |
कोकणात सोयाबीनचे क्षेत्र निरंक
राज्यात कोकण विभागात सोयाबीनची पेरणी सहसा होत नाही. या विभागातील वातावरण या पिकास फारसे पोषकही नाही. त्यामुळे यंदा या विभागात २१ ऑगस्टपर्यंत सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र निरकंच असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक वाढ पुणे विभागात
क्षेत्रातील वाढीचा तुलनात्मक विचार केल्यास यंदा पुणे विभागात सोयाबीनच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. या विभागात सरासरी १ लाख ५५ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी अपेक्षित असताना यंदा तब्बल ३ लाख ७१ हजार ६८३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. हे प्रमाण सरासरीच्या २३९ टक्के आहे.
राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र | ४१,४९,९१२ |
प्रत्यक्ष झालेली पेरणी | ५०,५९,५०५ |
सरासरीच्या तुलनेत पेरणीची टक्केवारी | १२२ |