Soybean Market :
लातूर :बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे. दरम्यान, किमान दरात अल्पशी वाढ होऊन ४ हजार रुपयांच्या पुढे आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची तूट थोडीफार कमी झाली आहे. परंतु यंदाच्या हंगामात अद्यापपर्यंत कमाल भावही हमीभावापर्यंत पोहोचला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर पेरा झाला होता. कधी रिमझिम, तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पीकही चांगले बहरले होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती.
परंतु सोयाबीन काढणीच्या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांत पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांचे सोयाबीन डॅमेज झाले. परिणामी, आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी राशी करून सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले असता, अत्यंत कमी भाव मिळाला.
कमाल भाव ४४०० रुपये
* गेल्या चार-पाच दिवसांपासून किमान दर वाढला आहे.
* शुक्रवारी सोयाबीनला कमाल दर ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत सर्वाधिक कमाल दर शुक्रवारी मिळाला. दरम्यान, आठवडाभरात ४ हजार २०० रुपयांच्या जवळपास भाव राहिला आहे.
सर्वसाधारण दर स्थिर...
* गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत सर्वसाधारण दर स्थिर राहिला आहे. मंगळवारी ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. ओलावा कमी झाल्याने दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.
बाजारपेठेत १९ हजार क्विंटल आवक
तारीख | आवक | किमान भाव |
२२ नोव्हें. | १९१८० | ४१०० |
२१ नोव्हें. | २३८७५ | ४०२१ |
१९ नोव्हें. | २९०७१ | ४१६० |
१८ नोव्हें. | २६१२७ | ४००० |
१६ नोव्हें. | २८६३३ | ४१८१ |
१५ नोव्हें. | २८३४९ | ३७८५ |
१४ नोव्हें. | ४२७०५ | ३८०० |
१३ नोव्हें. | ३६५२५ | ४००० |
१२ नोव्हें. | ४२०९२ | ३८०० |
११ नोव्हें. | ३२९४५ | ४००० |