Soybean Market Update :
सुनील काकडे
वाशिम :
यंदाच्या खरीप हंगामात लवकर पेरणी केलेल्या क्षेत्रातील सोयाबीन सोंगून बाजारात विक्रीस देखील आले आहे. मात्र, जुन्या सोयाबीनच्या तुलनेत या सोयाबीनला ६३५ रुपयांनी कमी दर दिला जात असल्याचे चित्र सध्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहावयास मिळते आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी केली जाते. त्यात ७० ते ७५ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापलेले असते. त्यानुसार, यंदाही एकूण पेरणी क्षेत्राच्या २ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे.
तथापि, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी सोयाबीनची लवकर पेरणी केली होती. अनुकूल वातावरणामुळे बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनचे चांगले उत्पन्न झाले असून नवे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात आहे.
२६ सप्टेंबर रोजी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या आणि जन्या सोयाबीनची एकुण ४ हजार ३०० क्विंटल आवक झाली. त्यातील जुन्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ४३५ ते ४ हजार ६४५ रुपयांचा दर मिळाला, तर नव्या सोयाबीनला मात्र प्रतिक्विंटल ३ हजार ८०० ते४ हजार २७० रुपयांचा दर देण्यात आला. एकाच शेतीमालात होत असलेल्या दरातील दुजाभावामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला आहे.
शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही जुने सोयाबीन
जिल्ह्यातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन मिळेल त्या दराने विकून टाकले आहे. त्यामुळे जुने सोयाबीन शिल्लक राहिले नाही आणि नव्या सोयाबीनचे दर पडल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
आद्रतेमुळे मिळतोय कमी दर
सोयाबीनच्या दरातील तफावतीबाबत व्यापाऱ्यांना विचारणा केली असता, नव्या सोयाबीनमध्ये आद्रतेचे (मॉईश्चर) प्रमाण २० ते ३० टक्के राहते. सुकल्यानंतर वजनात घट येत असल्यानेच नव्या सोयाबीनला दर कमी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोयाबीनची 'एमएसपी' ४८९२; 'नाफेड'ची खरेदी कधी सुरू होणार?
राज्य सरकारने सोयाबीनची एमएसपी (न्यूनतम आधार मूल्य) जाहीर केली असून 'नाफेड' मार्फत प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ इतक्या दराने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. तथापि, नवे सोयाबीन विक्रीस येणे सुरू झाले असून 'नाफेड'चे खरेदी केंद्र देखील सुरू होणे आवश्यक आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जुन्या सोयाबीनचे दर - ४ हजार ४३५ रुपये
नव्या सोयाबीनचे दर - ३८०० रुपये
क्विंटल मधील फरक - ६३५ रुपये