Join us

Soybean Market Update : खरंच सोयाबीनचे भाव वाढणार!  खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढीचा काय परिणाम वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 1:21 PM

केंद्र सरकारने रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. जाणून घेऊया सविस्तर (Soybean Market Update)

Soybean Market Update :

बुलढाणा : 

केंद्र सरकारने रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के एवढे केले आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या भावात थोडी वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीनच्या दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करीत अन्नत्याग आंदोलन केले होते. सोयाबीनला योग्य दर मिळावे यासाठी सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात २० ते ३० टक्क्यांची वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. 

११ सप्टेंबरला राज्य सरकार सोबत झालेल्या बैठकीत तुपकरांनी ही मागणी लावून धरली होती. त्या संदर्भात बैठकीतूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांसमोर दिल्लीला फोन लावला होता. 

कच्च्या खाद्यतेलावर याआधी ५.५ टक्के एवढे आयात शुल्क होते आता ते २७.५ टक्के एवढे करण्यात आले आहे, तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या १३.७५ टक्क्यांवरून आता ३५.७५ टक्के एवढे करण्यात आले आहे.  केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडा फायदा होणार असून, सोयाबीन दरवाढ होण्यास मदत मिळेल.

आधार प्रमाणीकरणास मिळाली मुदतवाढ

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरणास १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, संत्रा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील ३३ हजार ३५६ पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आयत शुल्क किती वाढले? 

*  कच्च्या खाद्यतेलावर यापूर्वी ५.५ टक्के आयात शुल्क होते. त्यात आता वाढ करून २७.५ टक्के एवढे करण्यात आले आहे. रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या १३.७५ टक्क्यांवरून आता ३५.७५ टक्के एवढे करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून  शेतकरी सोयाबीनचे हमीभावाने खरेदी व्हावी अशी मागणी करत होते.

अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केले जात होते. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी केली होती.त्याच बरोबर खाद्यतेल, सोया मिल्क आदी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावण्याची मागणीही करण्यात आली होती.

काय होणार परिणाम 

* सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी घेतलेला निर्णय असून  आयत शुल्क वाढवण्याचा निर्णयामुळे आता सोयाबीनच्या बाजार भावावर सकारात्मक परिणाम होणार आहे. सोयाबीन दरात भविष्यात नक्कीच वाढ होताना दिसणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनतेल शुद्धिकरण प्रकल्पशेतकरीशेती