Join us

Soybean Market Update : सणासुदीमुळे शेतमालाची लातूरच्या बाजारात आवक; दर मात्र जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 3:41 PM

लातूरच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. (Soybean Market Update)

सणासुदीचे दिवस असल्याने लातूरच्या बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे. सोयाबीन, करडई, उडीद, मूग, तूर, हरभरा, मका आदी शेतमाल बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणला आहे. दरामध्ये वाढ झाली नसली तरी शेतमालाच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, हा शेतमाल जुन्या हंगामातील असून नव्या हंगामाचा शेतमाल बाजारात येण्यासाठी आणखीन आवधी आहे. 

यंदा पाऊस काळ चांगला आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभापासून चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेत झाली होती. पिकेही जोमात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप असल्यामुळे पीक वाढीला अडथळा निर्माण होत आहे. 

वाफसा नसल्याने अंतर्गत मशागतीची कामेही रोखली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळालेल्या वेळेत जुना शेतमाल बाजारात आणला आहे.मंगळवारी (३ ऑगस्ट) रोजी बाजारपेठेमध्ये दहा हजार तीनशे चाळीस क्विंटल सोयाबीनची आवक होती.

त्याला सर्वसाधारण भाव ४ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल तरकिमान ४ हजार ६१९ आणि कमाल ४ हजार ७०० रुपये मिळाला. गेल्या पंधरा दिवसांतील दर अधिक आहे. दरम्यान सणासुदीमुळे आवक वाढली आहे.

नव्या हंगामातील उडीद, मूग बाजारात

यंदाच्या खरीप हंगामातील उडीद, मूग शेतमाल बाजारात विक्रीसाठी आलेला आहे. दर सर्वसाधारणच असला तरी सणासुदीमुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणले असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठ दहा दिवसांपासून सतत अधूनमधून पाऊस होत असल्यामुळे उडीद, मुगाच्या काढणीला अडथळा येत आहे. शेतकऱ्यांनी शेतात माल काढून ठेवला आहे. त्यांचा माल पावसामुळे भिजत आहे. वाफसा नसल्यामुळे ते गोळा करूनही ठेवता येत नाही अशी परिस्थितीत शेतकऱ्यांची फजिती होत आहे. त्यामुळे पावसाने उघडीप देण्याची गरज आहे.

दहा हजार ३४० क्विंटल सोयाबीनची आवक

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये दहा हजार तीनशे चाळीस क्विंटल सोयाबीनची आवक मंगळवारी होती. तुरीला सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये, मुगाला सात हजार सातशे रुपये, उडीदला आठ हजार मूग रुपये, तीळ बारा हजार पाचशे रुपये आणि करडई चार हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. गेल्या पंधरा दिवसांतील दर अधिक आहे. दरम्यान सणासुदीमुळे आवक वाढली आहे.

शेतमाल  आवक (क्विंटल)
हरभरा  ४४३
तूर  १५०  
मूग२३९२
उडीद  ५०१८  
करडई  ३७
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनमूगबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड